सौ अंजली दिलीप गोखले
वाचतांना वेचलेले
☆ ‘म्हातारपण…‘ – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
☆
हा प्रसंग माझ्या सास-यांच्या बाबतीत मी पाहिलेला आहे. त्यांना जाऊन आता चार वर्ष होतील.
दहा वर्ष झाली, माझी मुलगी दीड दोन वर्षाची असेल. तिला आणि बायकोला आणायला मी निवळीला (रत्नागिरी) गेलो होतो. त्यांना घेऊन आम्ही तसेच पुढे गणपती पुळ्याला गेलो. परतीचा रस्ता तोच असल्यामुळे जाताना परत भेटायचं असं ठरल होतं. हॉर्न दिला की घाटात एका वळणावर ते येणार होते.
आम्ही परत आलो तर ते कोकणातल्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात, रस्त्याच्या कडेला एका दगडावर थोडी सावली धरून, हातात काठी घेऊन बसून होते. म्हटलं, “आधीच आलात का?” तर सासूबाई म्हणाल्या, दीड तास झाला येउन त्यांना.
आम्हांला यायला दोनेक तास लागणार हे माहित असूनही, चुकामूक होऊ नये म्हणून, चुकामूक झालीच तर नात परत वर्षभर दिसणार नाही या भीतीपोटी असेल, ते तिथे बसून होते.
आधीच ते कमी बोलायचे. मुलीचा पापा घेऊन त्यांनी आभाळ दाटलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितलं. “आत्ता बघतोय, पुढच्या वर्षी?” हेही त्यात होतंच. निघाल्यावर गाडीचा ठिपका होईपर्यंत ते तिथेच थांबले असणार हे मागे न बघताही जाणवत होतं. खोटं नाही सांगत पण आत्ताही ते दृश्य माझ्या डोळ्या समोर उभं आहे.
म्हातारपण वाईट.
कारण मायेचे पाश तुटत नाहीत. माणसं महिनोनमहिने दिसत नाहीत. ती त्यांच्या कारणांमुळे आणि हे वयोमानामुळे मनात आलं तरी उठून जाऊ शकत नाहीत. मग सुरु होतं ते वाट बघणं. शिक्षाच आहे ती. गणपती, होळी किंवा मे ची सुट्टी याच वेळी येणार हे माहित असतं. अचानक काहीतरी कारण निघावं आणि त्यांनी यावं अशी स्वप्न काही दिवस बघितली जातात. रोज तेच स्वप्नं कितीवेळा बघणार? मग फोनवरून चौकशा चालू होतात, “जमेल का यायला?”, एवढे तीन शब्द जिभेच्या टोकावर तयारच असणार, पण ते बाहेर पडत नाहीत.
असे न उच्चारलेले पण ऐकायला आलेले शब्द फार फार आतवर रुतून बसतात.
म्हातारपण खरच वाईट. झाडावरून आंबा पडला तर, मोगरा अमाप आला तर, काही चांगलंचुंगलं खायला केलं तर, टी. व्ही. वर एखादं छान मूल दिसलं तर, यांना नातींचे चेहरे दिसतात.
“आत्ता इथे असत्या तर?”
आणि हे सततचं वाटणं सहन झालं नाही की मग अश्रू कुणाच्या परवानगीची वाट बघत नाहीत.
म्हणूनच, रडणारी म्हातारी माणसं मला कधीच दयनीय वाटत नाहीत. ते साठवलेलं रडणं असतं. अनेक महिने थोपवलेलं असतं ते.
खूप जणांना रडू येणं हे कमीपणाच वाटतं, अश्रू थोपवण्यात कसब आहे असं कुणाला वाटत असेल तर वाटू दे. पण मोकळं होण्याचा तो साधा, सोपा, सरळ, बिनखर्चिक उपाय आहे असं मला वाटतं. वेदना झाल्या की रडू येतं आणि संवेदना जिवंत असतील तर दुस-याच्या वेदना दिसल्या, वाचल्या, अनुभवल्या तरी पण रडू येतं.
मराठीत सहानुभूती असा एक सुंदर शब्द आहे. सह+अनुभूती, दुसरा जे काही आनंद, दु:खं किंवा इतर कुठलीही भावना अनुभवतोय, ती त्याच्यासह अनुभवणे, असा खरं तर त्याचा अर्थ आहे. दुर्दैवाने आपण तो फक्त दु:ख या एकाच भावनेशी चुकीचा अर्थ लावून जोडून टाकलेला आहे.
म्हातारपण गरीब असो वा सधन, मायेचा तुटवडा फार वाईट.
☆
लेखक : श्री जयंत विद्वांस
संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈