📖 वाचताना वेचलेले 📖
☆आश्चर्य… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆
☆
पोट दुखो, पाठ दुखो, हात दुखो, मान
डोकं दुखो, पाय दुखो, नाक दुखो, कान
काही झालं, तरी आपलं, औषध पोटात घ्यायचं?
औषधाला कसं कळतं, कुठल्या गल्लीत जायचं?
*
जिथे दुखतं, तिथे कसं, हे औषध पोचतं?
उजेड नाही, दिवा नाही, त्याला कसं दिसतं?
हातगल्ली, पायगल्ली, पाठीचं पठार
छातीमधला मोठा चौक, पोटाचा उतार
*
फासळ्यांच्या बोळामधून, इकडेतिकडे वाटा
औषधाला कसं कळतं, कुठून जातो फाटा?
लालहिरवे दिवे नाहीत, नाही पाटी, खुणा
पोलीसदादा कुठेच नसतो, वाटा पुसतं कुणा?
*
आई, असं वाटतं की, इतकं लहान व्हावं
गोळीबरोबर पोटात जाऊन, सारं बघून यावं
आईने गपकन धरलं, म्हणे, बरी आठवण केली
आज तुझी आहेच राजा, ‘एरंडेल‘ची पाळी
☆
कवी : अज्ञात
प्रस्तुती :सौ. उषा नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈