वाचताना वेचलेले
☆ ‘आनंद वाटणाऱ्या ओंजळी…!’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆3
☆
एखादा माणूस रोज हसतमुखाने दुसऱ्यांना मदत करतो. त्यांच्यासाठी वेळ देतो. प्रेम आणि माया वाटतो. तो खरोखरच श्रीमंत असतो. ह्या श्रीमंतीचा संबंध पैशाशी नसतो, तर अंतःकरणाच्या समृद्धीशी असतो.
कधी कधी वाटते, आपल्याकडे काय आहे दुसऱ्याला देण्यासाठी? पैसा नाही, मोठं घर नाही, भरगच्च वस्त्रालंकार नाहीत. पण या गोष्टींचा खरा अभाव नसतो. अभाव असतो तो आनंद वाटण्याच्या वृत्तीचा. ज्यांच्याकडे ही वृत्ती असते त्यांची ओंजळ कधी रिकामी राहत नाही.
मला आठवतेय, माझ्या गावातली एक आजी कायम उत्साहाने दुसऱ्यांच्या मदतीला धावून जायची. कुणाच्या घरी अडचण आली, की ती कधी डबा पाठवायची, कधी धीर द्यायची, कधी अंगणातली मोगऱ्याची फुलं गजऱ्यात गुंफून एखाद्या सूनबाईंना हसवत राहायची. तिच्या या प्रेमळ स्वभावामुळे सारा गाव तिला आपलीच म्हातारी मानायचा.
मी एकदा आजीला विचारलं, “आजी, तू एवढ्या सगळ्यांना मदत करतेस त्या बदल्यात तुला काय मिळतं?”
ती हसली आणि म्हणाली, “बाळा, आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधी रिकाम्या राहत नाहीत. परमेश्वर त्यांना पुन्हा भरून टाकतो. जशी विहीर पाणी देते, पण कधी कोरडी पडत नाही. अगदी तशीच माझीही ओंजळ आहे. “
मी विचार करत राहिलो. खरंच. आनंद, प्रेम, माया ही अशी संपत नसतात. उलट, जितकी जास्त वाटली, तितकी वाढत जातात.
संपन्नता ही केवळ गोष्टींमध्ये नसते. ती मनात असते. आणि जी माणसं दुसऱ्यांना आनंद देतात, ती आयुष्यभर कधीच रिकामी होत नाहीत!
☆
लेखक :अज्ञात
प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈