सौ. शशी नाडकर्णी-नाईक
वाचताना वेचलेले
☆ “पराभव…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆
☆
गौशालक हा महावीरांचा शिष्य होता, पण, त्याच्या मनात त्यांचा सुप्त द्वेष होता. वर वर तो त्यांचा अनुयायी होता, आतून त्यांना खोटं पाडायला तत्पर असायचा.
त्या दिवशीही वाटेत एक छोटं, कोवळं रोप दिसल्यावर तो महावीरांना म्हणाला, गुरुदेव, तुम्ही परमज्ञानी आहात, तर या रोपाचं भवितव्य जाणत असालच. या रोपाची मजल फुलं येण्यापर्यंत जाईल का?
महावीरांनी डोळे मिटले.
गौशालकाला आश्चर्य वाटलं. एवढ्या छोट्याशा प्रश्नासाठी डोळे मिटायची काय गरज?
महावीरांनी डोळे उघडले आणि ते म्हणाले, हो, हे रोप फुलं येण्यापर्यंत मजल मारेल.
तत्क्षणी गौशालकाने ते रोप जमिनीतून उखडून टाकलं आणि तो विकट हसून म्हणाला, आता?
महावीर सुहास्यमुद्रेने मौन राहिले.
पुढे सात दिवस खूप पाऊस पडला. महावीरांचं त्या रस्त्याने जाणं झालं नाही. सात दिवसांनी गुरुशिष्य पुन्हा त्याच रस्त्याने गेले. त्या रोपाच्या जागी पोहोचल्यावर गौशालक आश्चर्यचकित झाला. त्याने उपटून फेकलेलं रोपटं, फेकल्याजागी मुळं धरून पुन्हा उभं राहिलं होतं.
त्याने महावीरांना विचारलं, हे कसं झालं?
महावीर म्हणाले, गेले काही दिवस पाऊस झाला, जमीन मऊ होती, रोपट्याच्या मुळांनी माती पकडली, जीवन पकडलं, ते पुन्हा उभं राहिलं. हे रोपटं मुळापासून उपटल्यानंतरही जगण्याची तीव्र इच्छा ठेवणार की नाही, हेच मला त्या दिवशी जाणून घ्यायचं होतं. ते समजलं आणि मला कळलं की हे रोप फुलांपर्यंत जाऊ शकेल.
पण, ते रोपटं उपटलं जाणार आहे, हे तुम्हाला कसं कळलं, गौशालकाने भयभीत होऊन विचारलं.
महावीर म्हणाले, मी डोळे मिटले तेव्हा मला अंतर्मनात ते रोपही दिसलं आणि तूही दिसलास.
मान खाली घालून गौशालक पुढे निघाला. काही पावलं गेल्यावर महावीर म्हणाले, एका छोट्याशा रोपट्याकडून पराभव का करून घेतलास?
गौशालक उसळून म्हणाला, पराभव? कसला पराभव? माझा कसला पराभव?
महावीर म्हणाले, दुसऱ्यांदा ते रोपटं उखडून फेकण्याची, त्याचे तुकडे तुकडे करण्याची तुझी हिंमत नाही झाली ना.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈