वाचताना वेचलेले
☆ सुटका… लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆
भर समुद्रात एक बोट फुटली. एक माणूस वाचला आणि एका छोट्या बेटाच्या किनाऱ्याला लागला.
तो म्हणाला, देवा, तुझा चमत्कार अद्भुत आहे. तू माझा जीव वाचवलास.
त्याने त्या निर्जन बेटावर झावळ्यांची, पानांची एक झोपडी बांधली. तिच्यात तो राहू लागला. मासे मारून, फळं तोडून खाऊ लागला. कधीतरी एखादंजहाज जवळून जाईल आणि आपली सुटका होईल, अशी त्याला आशा होती.
तो सतत देवाची प्रार्थना करत असायचा.
एक दिवस तो फळं गोळा करून परत आला, तेव्हा त्याची झोपडी जळत होती, धुराचे लोट आकाशात उठत होते. ते दृश्य पाहून तो वेडापिसाच झाला. परमेश्वराला कोसू लागला. तू निर्दय आहेस, माझा आसरा हिरावून घेतलास. देव आहेस की सैतान, असं बोलू लागला. तेवढ्यात एक जहाज त्याच्या बेटाच्या दिशेने येताना दिसलं…
…बेटावरून सुटका होऊन जहाजावर आल्यावर त्याने कॅप्टनला विचारलं, पण, या बेटावर मी अडकलोय, हे तुम्हाला कसं समजलं?
कॅप्टन म्हणाला, तू धुराचा सिग्नल दिला होतास ना, त्यावरून.
लेखक: ओशाे
प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈