डॉ. ज्योती गोडबोले
वाचताना वेचलेले
☆ शेवटची सुट्टी…. ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆
असाच एक English picture बघितलेला…
‘Last Holiday’—‘ आयुष्याची शेवटची सुट्टी ‘— जरा उशिरा लावलेला पण तरीही थोड्या वेळाने कथानक लक्षात यायला लागलं…
त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरुणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच. मात्र एक दिवस तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं.
मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून, अजूनपर्यंत जी ‘सुट्टी घेणं’ परवडत नव्हतं, त्या ‘ मोठ्ठ्या सुट्टी ‘ वर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे.
ती उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये… आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत, उच्चभ्रू वर्तुळात वावरते.
तिथे तिच्या नशिबाचे फासे पलटतात. जुगारात शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो…पण ती देवाला विचारते….
” why now…? आयुष्य संपताना का एवढा मेहेरबान झालास? “
पण आता तिला कशाचंच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता ‘ आणखी काही ‘ गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा ‘ दांभिक सभ्यतेचा ‘ बुरखा फाडून, स्वतःशी आणि इतरांशी निव्वळ प्रामाणिक रहाते… वागतेे… बोलते.
आणि तिला जाणवतं—–
“ आतापर्यंत, आयुष्य गृहीत धरताना, आपण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोच नाही. केवळ ‘ भविष्य ‘ आणि ‘ लोकं काय म्हणतील ‘….याची चिंता करण्यात हे सुंदर आयुष्य फुकट घालवलं.”
” I have wasted too much of time on assumptions…..now I have time only for reality! ”
—–ती राहिलेलं दोन आठवड्यांचं आयुष्य सच्चेपणानं जगायला सुरुवात करते. तिच्या departmental store owner लाही खरी खोटी सुनावते… त्याच्या चुकीच्या वागण्याची जाणीव करून देते.
—–आणि अचानक तिला कळतं की तिचे reports चुकीचे आहेत… तिला कसलाही आजार नाही… ती एवढ्यात मरणार नाही. तिच्या आनंदाला पारावार रहात नाही. पण या last holiday नं शिकवलेला धडा, ती कधीच विसरत नाही. तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात—–
फिल्मी भाग सोडला, तर नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास खरंच विचार करायला लावणारा होता.
आपणही… आजचा – आत्ताचा क्षण कधी भरभरून जगतंच नाही… मनात कायम उद्याची चिंता ! काही तरी अशाश्वत मिळवण्यासाठी… कायम हातचं सोडून पळत्या पाठी, जीवाच्या आकांताने पळत रहातो—इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या् शर्यतीत सहभागी होतो.
सगळा आनंद, सगळी मजा, एखाद्या ‘ सुट्टीत ‘ उपभोगण्यासाठी, शिलकीत टाकत जातो….आणि —-आणि हे सगळं व्यर्थ आहे… जे खरच हवं होतं… तो आनंद, ते समाधान… हे या कशात नव्हतंच… हेे कळायच्या आतच… ‘ शेवटची सुट्टी लागते ‘.
शिलकीतली ‘ पुंजी ‘ तशीच राहून जाते… न वापरलेली… कोरीच्या कोरी… पण आता निरूपयोगी !
या ‘ शेवटच्या सुट्टी ‘ पर्यंत वाट न पाहता प्रत्येक क्षण , त्याच क्षणात, चिंता व भयमुक्त जगून घेतला तर?—-
—तर प्रत्येक क्षण त्या ‘सुट्टी’ इतकाच आनंद देईल.
संग्राहक : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈