वाचताना वेचलेले
☆ नात्यांमधील बदल ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर ☆
सकाळपासून घरामध्ये एखाद्या सणासारखं वातावरण होतं. सासूबाईंच्या चेहर्यावरील उत्साह आणि स्वयंपाकघरातून येणारा खाद्यपदार्थांचा घमघमाट या दोन्ही गोष्टींचं कारण एकच होतं – आज घरी दुपारच्या जेवणासाठी त्यांची एक मैत्रीण येणार होती. म्हणून घर पूर्णपणे सुशोभित केलं होतं.
काल संध्याकाळीच त्यांनी बोलता बोलता सांगितलं होतं की उद्या त्यांची एक मैत्रीण जेवायला घरी येणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी, आम्ही बाजारात गेलो आणि सासू- -बाईंनी एक छानशी, किंमती साडी आपल्या मैत्रिणीसाठी विकत घेतली.
आज तर त्या जणू काही वेगळ्याच पातळीवर होत्या. उत्साहाच्या भरात, त्या सकाळी माझ्या अगोदरच उठल्या होत्या. माझ्याआधीच स्वयंपाकघरात गेल्या आणि त्यांनी स्वतःच तयार केलेल्या यादीमधील एक एक पदार्थ, मनापासून व मोठ्या प्रेमाने बनवायला सुरुवातही केली होती.
त्या आज खूपच आनंदी दिसत होत्या. पण मी… मी मात्र खोट्या खोट्या हसऱ्या चेहऱ्याने आणि जड अंत:करणाने त्यांना मदत करत होते.
आज माझ्या आईचा वाढदिवस होता. माझ्या लग्नानंतरचा आईचा हा पहिलाच वाढदिवस होता. आणि ती एकटीच असणार होती. मी इथं सासरी, बाबा ऑफीसच्या कामासाठी बाहेरगावी आणि भाऊ तर आधीच परदेशात गेलेला होता.
काल मी माझे मन घट्ट करून माहेरी जाण्याचे ठरवले होते. मी याबाबत माझ्या सासूबाईंशी काही बोलणार, तेवढ्यात त्यांनीच त्यांच्या येणाऱ्या मैत्रिणीबद्दल व उद्याच्या ठरवलेल्या बेताबद्दल सांगितले. दुपारचे भोजन आणि संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून त्या मैत्रिणीबरोबर, फन सिटीला जाण्याचा कार्यक्रम त्यांनी ठरवला होता.
ह्यावर मी आता काय बोलणार होते? मी गप्पच राहिले आणि कामाला लागले. सर्व घर व्यवस्थितपणे आवरले आणि स्वतःही जरा नाराजीनेच तयार झाले. थोड्या वेळाने दारावरची बेल वाजली आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी सासूबाईंनी मलाच पाठवलं.
दरवाजा उघडल्यावर भल्या मोठ्या पुष्पगुच्छाच्या मागे लपलेला चेहरा जेव्हा समोर आला, तेव्हा माझे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले आणि मी ‘आ ‘ वासून बघतच राहिले ! कारण समोर उभी असलेली व्यक्ती म्हणजे, माझी आई होती. आई मला पुष्पगुच्छ देत म्हणाली, ” सरप्राईज! “
आश्चर्याने आणि आनंदाने, मी तिथे उभी राहून आपल्या आईकडे एकटक बघत होते.
” वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही का देणार माझ्या मैत्रिणीला? ” मागे उभ्या असलेल्या सासूबाईंनी विचारले.
“माझी आई… तुमची मैत्रीण?” मी मोठ्या आश्चर्याने विचारले.
“अग, हो ! मी खोटं नाही बोलत ! कोण म्हणतं की विहीणी-विहीणी मैत्रिणी होऊ शकत नाहीत? ” सासूबाई म्हणाल्या.
“ नक्कीच होऊ शकतात. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सासू आपल्या सुनेचे, मुलीसारखे लाड करू शकते आणि तीच विहिणीला पण मैत्रीण बनवू शकते.” असे म्हणून माझ्या आईने पुढे होऊन सासू- बाईंना मिठीच मारली.
आनंदाने माझ्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता, फक्त डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले होते. मी सासूबाईंचे हात हातात घेऊन डोळ्यांना लावले आणि त्यांच्या हाताच्या तळव्यांचे मुके घेतले व त्यांना मिठी मारली. आम्हा दोघींना बघून, माझ्या आईच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या व तिने स्मित हास्य केले.
नात्यांचा हा उत्सव, अत्यंत प्रेमाने साजरा करत असताना, एका बाजूला माझी आई होती, जिने मला नात्यांचं महत्त्व शिकवलं, तर दुसरीकडे माझ्या सासूबाईं- ज्यांनी नातं हृदयापासून कसं जपायचं हे शिकवलं.
दोघीजणी माझ्याकडे बघून हसत होत्या आणि त्या दोघींच्यामधे उभी राहून, मी माझ्या नशिबावर खूष होत होते. माझ्या डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर मात्र हसू फुलले होते.
स्वतःला महत्त्व कसे मिळेल, याकडे लक्ष देण्यापेक्षा दुसऱ्यांना “मान” कसा देता येईल याविषयी आपण विचार केला पाहिजे, हे मनापासून पटलं मला.
संग्राहिका : सुश्री मीनल केळकर
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈