श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ अप्रूप पाखरे – ३२– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
[1]
पणतीच्या हातून
मोठाच प्रमाद घडला एकदा
काचदिव्याच्या ज्योतीला
मावसबहिण म्हणण्याचा…
वेडीवाकडी फडफडात
काचदिव्याची ज्योत
धमकावत राहिली तिला
कर्कश करड्या आवाजात
आणि तेवढ्यात
प्रकाशाचा गंध उधळत
चंद्रकोर उगवली
आणि काचदिव्याची ज्योत
नम्रकोमल झाली ,
लाडिक वळणांचे शब्द
लाडे लाडे निसटले-
‘ताई…
माझी लाडकी ताई
[2]
संपूर्ण सत्य बोलण्यासाठी
वाट पाहायची तयारी नसेल
तर किती सोपं असतं
परखड बोलणं
[3]
किती मौल्यवान असते
फळाची सेवा
आणि किती मधुर
फुलाची सेवा
पण हवी मला
पानाची सेवा
डेरेदार…
नम्र… अर्पित
शांत … शीतल
[4]
धुक्याचा आणि पावसाचा पदर
चेहर्यावर ओढून
उदास बसलेली
ही परित्यक्त संध्याकाळ …
माझ्या एकाकी हृदयात
जाणवत आहेत मला
तिचे खोल सुस्कारे
मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)
प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈