श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ आधीच आलिंगन द्या…. कवी : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
बॉडी डेड होण्या आधीच आलिंगन द्या
कवी : प्रा.विजय पोहनेरकर
आयुष्य खूप छोटं आहे
भांडत नका बसू
डोक्यात राख भरल्यावर
फुटणार कसं हसू ?
अहंकार बाळगू नका
भेटा बसा बोला
मेल्यावर रडण्यापेक्षा
जिवंतपणी बोला
नातं आपलं कोणतं आहे
महत्वाचे नाही
प्रश्न आहे कधीतरी
गोड बोलतो का नाही ?
चुकाच शोधत बसाल तर
सुख मिळणार नाही
चूक काय बरोबर काय
कधीच कळणार नाही
दारात पाय ठेऊ नको
तोंड नाही पहाणार
खरं सांगा असं वागून
कोण सुखी होणार ?
तू तिकडे आम्ही इकडे
म्हणणं सोपं असतं
पोखरलेलं मन कधीच
सुखी होत नसतं
सुखाचा अभास म्हणजे
खरं सुख नाही
आपलं माणूस आपलं नसणे
यासारखे दुःख नाही
नातं टिकलं पाहिजे असं
दोघांनाही वाटावं
कधी गायीने कधी वासराने
एकमेकाला चाटावं
तुमची काहीच चूक नाही
असं कसं असेल
पारा शांत झाल्यावरच
सत्य काय ते दिसेल
ठीक आहे चूक नाही
तरीही जुळतं घ्या
बॉडी डेड होण्या आधीच
आलिंगन द्या
स्मशानभूमीत चांगलं बोलून
काय उपयोग आहे
जिवंतपणी कसे वागलात
जास्त महत्वाचं आहे
माझ्या कवितेत कोणतंही
तत्वज्ञान नाही
तुम्ही खुशाल म्हणू शकता
कवीला भान नाही
ठीक आहे तुमचा आरोप
मान्य आहे मला
माझं म्हणणं एवढंच आहे
वाद नको बोला
कवी : प्रा.विजय पोहनेरकर
प्रस्तुती श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈