श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग पहिला ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆
एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये ! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत आहे. ही सर्व प्रतिभा त्या त्या कवींची आहे. मराठी भाषेबद्दल आदर वाढविणाऱ्या या प्रयोगाबद्दल सर्वांचे आभार—-
—–मकरंद करंदीकर
विंदा करंदीकर यांची मूळ कविता (जी मुळात लईभारी हे 🙂 ). मराठीच्या बहिणी असलेल्या अनेकानेक भाषांमधे.
विठ्ठल (मूळ कविता)
पंढरपूरच्या वेशीपाशी
आहे एक छोटी शाळा
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा ॥
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे
अट्टल
मास्तर म्हणतात करणार काय?
न जाणो असेल विठ्ठल ॥
©️ विंदा करंदीकर
============
इट्टल – (नगरी बोली)
पंडरपुरच्या येसिपासी
हाये येक छुटी साळा
सर्वी पोरं हायेत गुरी
योक मुल्गा कुट्ट काळा
दंगा कर्तो मस्ती कर्तो
खोड्या कर्ण्यात बी आट्टल !
मास्तर म्हंती करनार काय ?
न जानू ह्यो आसन इट्टल !!!
काकासाहेब वाळुंजकर
– अहमदनगर
==============
इट्टल – (मराठवाडी बोली)
पंडरपूरच्या येशीपशी
हाय बारकी साळा एक
सगळी पोरं हायत गोरी
कुट्ट काळं त्येच्यात एक
आगावपणा करतंय पोराटगी करतंय
आवचिंदपणाबी करण्यात हाय
आट्टल…
गुरजी मनत्यात करावं काय?
एकांद्या टायमाला आसंलबी इट्टल!
डॉ.बालाजी मदन इंगळे
– उमरगा
===============
इठ्ठल – (लेवा गणबोली)
पंढरीच्या येशीपाशी
आहे एक छोटुशी शाया
सर्वे पोऱ्हय गोरे
एक पोऱ्या कुट्ट काया
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या कऱ्यात आहे अट्टल
मास्तर म्हने करे काय
न जानो अशीन इठ्ठल
प्रशांत धांडे
– फैजपूर
=======
ईठ्ठल – (अहिराणी रुपांतर)
पंढरपूरना शीवजोगे
एक शे धाकली शाया;
सम्दा पोरे शेतस गोरा
एक पोर्या किट्ट काया ||
दांगडो करस, मस्त्या करस
खोड्या कराम्हा शे अट्टल;
मास्तर म्हने काय करो ?
ना जानो हुई ईठ्ठल ||
नितीन खंडाळे
– चाळीसगाव
==========
इठ्ठल – (तावडी अनुवाद)
पंढरपूरच्या येसजोय
आहे एक छोटी शाया
सम्दे पोरं आहेती गोरे
एक पो-या कुट्ट काया ll
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या क-यामधी आहे अट्टल
मास्तर म्हनता करनार काय?
ना जानो असीन इठ्ठल ll
प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे
– जळगाव
==============
प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈