श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ उगवतीचे रंग-कधी कधी मला वाटतं… श्रीविश्वास देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
कधी कधी मला वाटतं
विद्यार्थी व्हावं अन
विंदा मास्तरांच्या वर्गात बसावं
‘ कोणाकडून काय घ्यावं..’
ते त्यांनी शिकवावं.
वर्गातून बाहेर पडताना
विंदांकडून कवितेची
हिरवी पिवळी शाल घ्यावी
आयुष्यभरासाठी समाधानाने
अंगावर ओढून घ्यावी.।। १ ।।
कधी कधी मला वाटतं
साने गुरुजींच्या वर्गात बसावं
श्यामची आई लिहिणाऱ्या
प्रेमळ श्यामला अनुभवावं.
त्यांच्या डोळ्यातलं
अपार प्रेम, माया अनुभवावी.
‘ खरा तो एकची धर्म’
शिकवण त्यांच्याकडून घ्यावी. ।। २ ।।
कधी कधी मला वाटतं
बोरकरांच्या वर्गात बसावं
त्यांचे सागरासारखे
सागरापरी गहिरे डोळे अनुभवावे
जे ‘ जीवन त्यांना कळले हो ‘
ते मलाही शिकवाल का
विचारावं. ।। ३ ।।
कधी कधी मला वाटतं
कुसुमाग्रजांच्या वर्गात जावं
कशास आई भिजविसी डोळे
त्यांच्याकडून ऐकावं
रात्रीच्या गर्भातील उषा:कालाची
आशा जागवीत निघावं.
पाठीवर तात्यासाहेबांचा हात असावा
‘ लढ रे पोरा…’ ऐकताना
‘ कणा ‘ ताठ व्हावा. ।। ४ ।।
कधी कधी मला वाटतं
शांताबाईंकडे जावं
ऋतू हिरवा, ऋतू बरवा
कुठे भेटला जाणून घ्यावं ।। ५ ।।
माझे जीवनगाणे लिहिणाऱ्या
पाडगावकरांच्या वर्गात
एक चक्कर मारावी
विचारावं त्यांना…
व्यथा असो आनंद असो
तुम्ही गात कसे राहता
आनंदाच्या रसात न्हात कसे राहता
त्यांच्या चष्म्याआडच्या
प्रेमळ, मिश्किल डोळ्यात
खोल खोल डोकावून बघावं
‘ शतदा प्रेम करावे ‘ चं
रहस्य समजून घ्यावं. ।। ६ ।।
कधी कधी मला वाटतं
ग्वाल्हेरला तांब्यांकडे जावं
‘ कळा ज्या लागल्या जिवा… ‘
त्या जीवाला भेटावं
दिवसभर त्यांच्या जवळ राहावं
पहाटे त्यांच्याकडून
‘ घनतमी राज्य करणाऱ्या शुक्राला ‘ बघावं
‘ ते दूध तुझ्या त्या घटातले ‘ चा गोडवा
त्यांच्याकडूनच अनुभवावा.
सायंकाळी त्यांच्यासोबत
‘ मावळत्या दिनकराला ‘ प्रणाम करावा.
‘ तिन्ही सांजा सखे मिळाल्या…’
ऐकताना पुन्हा भेटण्याचं
‘ देई वचन मला…’ म्हणावं. ।। ७ ।।
कधी कधी वाटतं
जावं बालकवींच्या गावा
पाय टाकुनी जळात बसलेला
तो ‘ औदुंबर ‘ अनुभवावा.
सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुन घ्यावे
आनंदी आनंद गडे च्या सड्यात
न्हाऊन निघावे. ।। ८ ।।
कधी कधी वाटतं
सुरेश भटांना गाठावं
‘चांदण्यात फिरताना’
त्यांच्याशी संवाद साधावा
दुभंगून जाता जाता
मी अभंग कसा झालो
त्यांच्याकडून ऐकावं. ।। ९ ।।
कधी कधी मला
असं खूप काही वाटतं
कवी आणि कविता यांचं प्रेम
हृदयात दाटतं.
कवी असतात
परमेश्वराचेच दूत
घेऊन येतात प्रतिभेचं लेणं
तुमच्या माझ्यासाठी
ते असतं
नक्षत्रांचं देणं. ।। १० ।।
कवी : श्री विश्वास देशपांडे, चाळीसगाव
०९/०२/२०२२
प्रतिसादासाठी ९४०३७४९९३२
(कृपया कविता नावासह शेअर करावी)
प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈