सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
प्रस्तावना-
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना गीतांजली साठी नोबेल पारितोषिक मिळाले. एक तत्त्वज्ञ, महाकवी यांची, गंगेच्या किनारी नीरव शांततेत, निसर्गाची अनेक अद्भुत रुपे पहात फिरताना तरल सर्वव्यापी काव्यनिर्मिती म्हणजे गीतांजली. प्रेम, समता आणि शांती यांचा संदेश देणारी. इंग्रजी भाषेतील गीतांजली मा. ना. कुलकर्णी यांच्या वाचनात आली. इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते तसेच त्यांना साहित्याची आवड होती. संत साहित्याचे वाचन, चिंतन, मनन करत असत. टागोरांची गीतांजली त्यांना निसर्गरुपी ईश्वराशी तादात्म्य पावणारी कविता वाटली. त्यांना मिळालेले ज्ञान, तो आनंद, इतरांना मिळावा म्हणून त्याचा मातृभाषेत भावानुवाद केला, जो पुस्तक रुपाने प्रसिद्ध झाला. ई- अभिव्यक्ती – मराठी मध्ये या कविता क्रमशः प्रसिद्ध होत आहेत, ह्यासाठी सर्व संपादक मंडळाला मी कृतज्ञता पूर्वक धन्यवाद देते.
☆ गीतांजली भावार्थ ☆
१.
हे नाजूक भांडे तू पुन्हा पुन्हा रिते करतोस,
आणि नवचैतन्याने पुन्हा पुन्हा भरतोस
ही बांबूची छोटी बासरी
दऱ्याखोऱ्यांतून तू घुमवितोस
तिच्यातून उमटणारे नित्यनूतन संगीत
तुझेच श्वास आहेत.
तुझ्या चिरंतन हस्त स्पर्शाने
माझा चिमुकला जीव आपोआपच
मर्यादा ओलांडतो
आणि त्यातून चिरंतन बोल उमटतात
माझ्या दुबळ्या हातात न संपणारं दान ठेवतोस,
युगं संपली तरी ठेवतच राहतोस,
आणि तरीही ते हात रितेच राहतात
तुझी किमया अशी की,
मला तू अंतहीन केलेस !
२.
मी गावं अशी आज्ञा करतोस यात
केवढा माझा गौरव
नजर वर करून तुला पाहताना
माझं ह्रदय उचंबळून येतं
बेसूर जीवन मुलायमपणे एका
मधुर संगीतानं फुलून येतं
आणि सागरावर विहार करणाऱ्या
समुद्र पक्ष्याप्रमाणं
माझी प्रार्थना पंख पसरते
माझं गाणं ऐकून तू सुखावतोस
तुझ्या सान्निध्यात एक गायक म्हणूनच
मला प्रवेश आहे
ज्या तुझ्या अस्पर्श पावलांना
माझ्या दूरवर पसरणाऱ्या गीतांच्या पंखांनी
मी स्पर्श करतो,
गाण्याच्या आनंद तृप्तीने मी स्वतःला विसरतो
– मा. ना.कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
फोन नंबर – 7387678883
©️ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈