सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
३.
आणि हे स्वामी, मी भितरा अशी साद घालतो
हे स्वामी, तू गातोस आणि मी शांत चकित होऊन
ते फक्त ऐकत राहतो
तुझ्या संगीताच्या प्रकाशात सारे जग उजळून निघते
तुझ्या संगीताच्या जिवंत स्पर्शानं
आकाशाचा कोपरा अन् कोपरा उजळून निघतो
तुझ्या पवित्र संगीताचा ओघ पाषाणांचे अडथळे पार करून वाहातच असतो
तुझ्या गीतात सूर मिसळायची धडपड मी मनापासून करतो, पण आवाज उमटत नाही
मी गायचा प्रयत्न करतो, पण ध्वनीच उमटत नाही, अर्थ निघत नाही, ते फक्त अरण्यरुदनच ठरते
हे स्वामी, तुझ्या संगीतमय धाग्यात तू मला बंदिवान करून ठेवले आहेस.
४.
माझ्या जीवनाच्या जीवना,
माझ्या सर्वांगावर तुझ्या अस्तित्वाचा स्पर्श आहे,
ही जाणीव ठेवून मी माझे शरीर स्वच्छ व शुद्ध
ठेवण्याचा सतत प्रयत्न करतो
माझ्या मनाच्या गाभाऱ्यात
श्रध्देची व सत्याची ज्योती
सतत तेवत रहावी म्हणून सत्याचा
प्रकाश फेकणारा तूच आहेस
या जाणिवेने साऱ्या असत्यांचा पसारा
मी बाजूस सारतो
माझ्या अंत: करण्याच्या गाभाऱ्यात
तुझीच पुष्पांकित मूर्ती विराजमान आहे,
ही जाणीव ठेवून माझ्या अंत: करण्यातून
सर्व दुष्ट प्रवृत्ती सतत दूर ठेवायचा मी प्रयत्न करतो.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈