वाचताना वेचलेले
☆ काय दिलं कवितेनं ? ☆ सौमित्र ☆
काहीच दिलं नाही कवितेनं
उलट बरंच काही घेतलं माझ्यातलं
बरंच काही देऊन
गाणं दिलं आधी गुणगुणणं दिलं
छंद दिले मुक्तछंद दिले मग एक दिवस
प्रेम विरह आणि हुरहुर दिली
रडणं दिलं उगाचचं हसणं दिलं
कडकडीत ऊन घामाच्या धारा
संध्याकाळ कातरवेळचा पाऊस
पावसाची पहिली जाणीव दिली
समुद्र दिला किनारा दिला
लाटांवर हलणारी बोट
वाट पाहणं दिलं बोटीवरलं
नंतर रस्त्यांवरली निरर्थक वर्दळ
रात्री अपरात्रीचे रिकामे रस्ते
त्यावरलं उगाचचं दिशाहीन चालणं दिलं
निरंतर जागरण बिछान्यातली तळमळ
हळूहळू डोळ्या देखतची पहाट दिली
पुढे निरर्थक दिवस निर्हेतुक बसून राहाणं
त्यानंतर दारू, नशा, गडबड, गोंधळ
हँगओव्हर्स दिले हार्ट ॲटॅक वाटणारे
लगेच ॲसिडीटी, झिंटॅग-पॅनफॉर्टी
काल कागद दिला कोरा
आज न सुचणं दिलं
थांबून राहिलेला पांढराशुभ्र काळ
कागदावर पेन ठेवताना अनिश्चिततेचा बिंदू
बिंदूतून उमटलेला उत्स्फूर्त शब्द वाक्य होताहोता
झरझर वाहणारा झरा दिला
प्रसिद्धी, गर्दी, एकांत दिला गर्दीतला
ताल भवतालासह आकलन दिलं
दिलं सामाजिक राजकीय भान
लगेच भीती दिली पाठलाग
मागोमाग दहशत घाबरणं
गप्प होण्याआधीचं बोलणं दिलं
चिडचिड स्वत:वरली जगावरला राग
अखेर जोखीम दिली लिहिण्याची
लिहिलेलं फाडण्याची हतबलता
अपरिहार्यता दिली दिसेल ते पाहण्याची, पाहात राहण्याची आज़ादी दिली
स्वातंत्र्य दिलं पारतंत्र्य दिलं
आंधळं होण्याचं
दिलं बरंच काही दिलं पण
काढूनही घेतलं हळूहळू एकेक
आणि आज
बोथट झालेल्या संवेदनेला
कविता म्हणते
लिही
आता लिही
– सौमित्र
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈