सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ || देहोपनिषद सिद्ध झाले…. || पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज 7 मे.. विदुषी दुर्गाबाई भागवत यांचा स्मृतिदिन! ..मला लाभलेल्या त्यांच्या सहवासातील काही हृदयस्पर्शी आठवणी….

हिरवीकंच साडी, हिरवागार परीटघडीचा ब्लाऊज, मनाचा ठाव घेणारी नजर, ताठ बांधा, छोटासा गोंडस अंबाडा आणि त्यावर हौसेनं माळलेला घमघमीत मोगरीचा गजरा! अहाहा! काय तेजस्वी ते रूप आणि ओजस्वी ती वाणी! आणि तेही वयाच्या ८६व्या वर्षी! या रूपाला पाहण्यास आणि ही लख्ख वाणी ऐकण्यास पार्ल्यातील ‘दीनानाथ नाट्यगृह’ त्यादिवशी चोखंदळ साहित्यिक, संगीतज्ञ आणि रसिकांनी खचाखच ओसंडून वाहात होतं. प्रसंग होता – माझ्या पहिल्यावहिल्या ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ हा कॅसेटचा प्रकाशन सोहळा – या ज्ञानदेवीच्या शुभहस्ते! ही ज्ञानदेवी म्हणजे दुर्गादेवीचा आणि शांतादेवीचा सुरेख संगम! ती स्वतःच ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ होती! तिच्या येण्यानंच प्रत्येकाच्या मनात उत्साह, आनंद, कुतूहल आणि उत्सुकता भरून वाहात होती! गझल सम्राट जगजीत सिंह यांनाही तिच्या शेजारी बसण्याचं, मोठं अप्रूप वाटत होतं. 

२६ मे, १९९६ हा तो दिवस!  याच दिवशी सकाळी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ‘जागविला सुखांत एकांत’ हा ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ कॅसेटमधील प्रत्येक गाण्याचं, समर्पक रसग्रहण करणारा लेख लिहून, दुर्गाबाईंनी अनेकांना धक्काच दिला होता! प्रकाशनाच्या वेळी त्यांच्यावर झालेल्या गुलाब पाकळ्यांच्या वर्षावानं, बाई आधीच मोहरून गेलेल्या! त्या बोलल्याही अप्रतिम! आणि पूर्व वयात विरघळून जाऊन चक्क ‘केदार’ रागातली बंदिशही  लाजवाब गायल्या! कुठचाही विषय त्यांना वर्ज्य नव्हता! दुर्गाबाई म्हणजे अर्वाचीन काळातली गार्गी – मैत्रेयीच! त्या केवळ साहित्य विदुषीच नव्हे तर दुर्गाबाई म्हणजे अखंड ज्ञानयज्ञ! स्वातंत्र्य सेनानीपासून ते स्वयंपाक, विणकाम, भरतकामापर्यंत कुठल्याही क्षेत्रात दुर्गाबाई अग्रेसर! ज्या क्षेत्रात हात घातला, त्याचं सोनं केलं त्यांनी!

एकदा, बहीण कमला सोहोनींबरोबर त्या एक इंग्रजी चित्रपट पाहत होत्या. त्यातील नायिका, आपण नेहमी घालतो, त्यापेक्षा वेगळया पद्धतीने टाके घालून, स्वेटर विणत होती. हे बारकाईनं निरीक्षण करून, त्यांनी एका व्यक्तीचा एक स्वेटर एका दिवसात तयार होतो, हे स्वतः विणून सिद्ध केलं.. वयाच्या नव्वदीलाही त्यांची कुशाग्र बुद्धी तोंडात बोटंच घालायला लावी! या वयातही नवनवीन गोष्टी करण्याचा आणि शिकण्याचा त्यांचा ध्यास पाहून आश्चर्य वाटे! त्यांच्या ९०व्या वाढदिवसाला, त्यांनी मला भेट दिलेला, त्यांचा आवडता, निवृत्तीनाथांचा एक अभंग मी गायले. त्यावेळी बरीच जाणकार मंडळी तिथं होती. गाणं संपल्यावर, दुर्गा आज्जींनी या ‘नातीचा’ पापा घेतला आणि हातही हातात घेतला. माझे ‘थंडगार’ हात पाहून त्या गोड हसल्या आणि पट्कन म्हणाल्या, – “Cold from outside, Warm from inside… !” 

बाईंनी अनेकांना घडवलं. प्रोत्साहन दिलं, कौतुक केलं. त्या अनेक भाग्यवंतांपैकी मीही एक आहे!

काही वर्षांपूर्वीची गोष्ट… मी इतरांच्या चालीत नवीन बसवलेल्या काही कविता, बाईंसमोर नेहमीप्रमाणं म्हणून दाखवायला गिरगांवात त्यांच्या घरी गेले त्यावेळी त्या म्हणाल्या, “अगं पद्मजा, फार बरं झालं तू आलीस. आज नवलच घडलं! आज शाकंभरी पौर्णिमा. पहाटे, चंद्रबिंब अस्त होताना, माझ्या वडिलांनी, त्यांच्या स्मृतिदिनी मला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि ‘देहोपनिषद’ माझ्या पुढ्यात आले, ते असे…

|| देहोपनिषद ||

‘आयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत ||१||

भय गेले मरणाचे, कोंब फुटले सुखाचे ||२||

अवयवांचे बळ गेले, काय कुणाचे अडले ||३||

फुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे ||४||

मरणा, तुझ्या स्वागतास, आत्मा माझा आहे सज्ज ||५||

पायघडी देहाची ही, घालूनी मी पाही वाट ||६||

सुखवेडी मी जाहले, ‘देहोपनिषद’ सिद्ध झाले… ||७||

पुढे त्या म्हणाल्या, “आजवरच्या माझ्या कविता, मलाच न आवडल्यानं मी फाडून, जाळून फेकून दिल्या. ही माझी मला आवडलेली एकमेव कविता! याला तू चाल लाव, आणि उद्या माझी दूरदर्शनवर मुलाखत आहे, त्यात तू ते गा!” 

मी प्रथम ते ‘देहोपनिषद’ वाचूनच भांबावले. परंतु दुर्गाआज्जीला नाही म्हणण्याची माझी प्राज्ञाच नसल्यामुळे मी आजवर, कधीही न केलेला संगीत दिग्दर्शनाचा प्रयत्न, परमेश्वरी कृपेनं सफल झाला. त्यांनीच संगीत दिग्दर्शनाची माझ्या ‘मनी’ अंतर्ज्योत पेटवली!

दुसर्‍या दिवशी दुर्गाबाईंनी दूरदर्शनवर “आता ‘नारददुहिता’ माझी कविता सुंदर गाणार आहे,” असं म्हणून माझं मोठ्या मनानं कौतुक केलं, प्रोत्साहन दिलं. त्यानंतर मात्र मला आत्मविश्वास आला आणि मी जवळजवळ दीडशेहून अधिक कवितांना, अभंगांना धडाधड चाली लावत गेले. केवढी भव्य आणि सुंदर दृष्टी दिली मला दुर्गाबाईंनी!!

एकदा सुप्रसिद्ध कवयित्री वंदना विटणकरांना (त्यांच्या लहानपणी) ‘पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर’ यांच्या विषयी लेख लिहिण्यासाठी कुठेही माहिती मिळेना. तेव्हा दुर्गाबाईंना त्यांनी एशियाटिक सोसायटीच्या भव्य ग्रंथालयात गाठलं आणि दुर्गाबाईंनी तात्काळ त्यांना अहल्याबाईंचे पन्नास एक संदर्भ पूर्ण माहितीसकट दिले. शिवाय, “ग्रंथालयाच्या एका कोपर्‍यात ‘होळकरांची बखर’ बांधून ठेवलीय, ती मुद्दाम वाच.” असंही सांगितलं. हे सर्व सांगण्यात कुठेही गर्वाचा, उपकाराचा लवलेशही नव्हता. उलट, कुणीही न निवडणारा, वेगळा आणि उत्तम विषय घेतल्याबद्दल छोट्या वंदनेचं अभिनंदन आणि कौतुकही केलं. शिवाय दुपारच्या उन्हातान्हातनं आलेल्या या मुलीला प्रेमानं, आपल्या डब्यातली रुचकर चटणी आणि थालीपीठ खाऊ घातलं! त्याची चव वंदनाबाईंच्या जिभेवर अखेरपर्यंत होती. 

दुर्गाबाईंना जसं साहित्याचं प्रेम, तसंच निसर्ग आणि तत्त्वचिंतनाचंही! तत्त्वचिंतक थोरोच्या निसर्गप्रेमामुळं बाईंचं त्यांच्यावर मनस्वी प्रेम! याच थोरोवर इंदिरा गांधींनी केलेली कविता वाचून बाईंनी इंदिरेच्या आतील ‘कलावंताला’ सलाम केला आणि इंदिरा गांधींमुळे  आणीबाणीत भोगाव्या लागणार्‍या हालअपेष्टा विसरून, त्यांच्या अक्षम्य चुकाही माफ करून टाकल्या. केवढं पारदर्शक आणि आभाळाएवढं मन दुर्गाबाईंचं! हाच प्रांजळपणा त्यांच्या लालित्यपूर्ण लेखनातही दिसतो, म्हणून त्यांचं लेखन हे बुद्धीला आणि अंतःकरणाला थेट भिडणारं वाटतं. ते वाचताना त्या प्रत्यक्ष समोर बसून बोलताहेत असंच वाटतं.

त्यांनी सांगितलेल्या दोन गोष्टी मी कधीच विसरणार नाही. एक म्हणजे – ‘रिकामा अर्धघडी राहू नको रे…’ आणि म्हणूनच मला वाटतं, इतक्या विविध विषयांवर त्या प्रभुत्व मिळवू शकल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे, ‘कुठलंही काम करताना, त्यात जीव ओतून केल्यास ते  १०० टक्के यशस्वी होतं, त्यात उत्स्फूर्ता आणि उत्कटता मात्र हवी!’ 

७ मे, २००२… दुर्गाबाई निवर्तल्याची बातमी ऐकली आणि काळजात चर्र झालं. त्यांच्या घरी जाऊन त्यांना नमस्कार केला. त्यांच्या सुनेनं – चारुताईनं मला ‘देहोपनिषद’ म्हणायला सुचवलं. शेवटी त्यांच्या पार्थिवाशेजारी बसून, माझ्या या आज्जीच्या डोक्यावरून कुरवाळत कुरवाळत मी ‘देहोपनिषद’ गायले. त्याक्षणी ती नेहमीसारखीच प्रसन्न आणि तेजस्वी दिसली. जणू काही डोळे मिटून तिला आवडणारं देहोपनिषद, ती अत्यंत आनंदानं ऐकत होती.. 

‘देहोपनिषद सिद्ध झाले..’ हीच भावना तिच्या चेहर्‍यावर विलसत होती…

लेखिका – पद्मजा फेणाणी जोगळेकर

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments