श्री विनय माधव गोखले
वाचताना वेचलेले
☆ ‘अन्न हे पूर्णब्रह्म‘ ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
एका लग्नाला गेलो होतो . जेवणाचा तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते . युनिफॉर्म घातलेल्या सुंदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला …. हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो …..
तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .
सौ. ने हात खेचत म्हटले ” अहो जरा दमाने घ्या , मिळते म्हणून सर्व घेऊ नका , मग फेकून द्याल ”
मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली . थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले ….. अधिक काही खाववेना . नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो . रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता …..
माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला—-
“सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??”
अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले .
” ही तुमची डिश आहे ना ?? “
” होय,” मी परत उत्तरलो .
” हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ?? म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल ”
मी चकित झालो . थोडा रागही आला . त्याच रागात बोललो, ” अहो थोडे राहिले अन्न ? काय हरकत आहे .
नाही अंदाज आला .म्हणून काय घरी न्यायचं ?? “
” रागावू नका ” तो गोड हसत म्हणाला .“ हे मोठ्यांच लग्न आहे . पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला . हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे . बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही . कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ . आमची 25 माणसे . पण तरीही अन्न उरणारच . आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न !! त्याचे काय ?? राग मानू नका . पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार दिवस आम्ही मेहनत करतोय , उत्कृष्ट प्रतीची भाजी , मसाले खरेदी केले. आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तम प्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत…. होय ,त्यासाठी आम्ही मागू तेवढे पैसे तुम्ही दिलेत हे मान्य आहे . पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत . आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा …..म्हणून आम्ही ही शक्कल लढवली , हॉटेलमध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता…….. का ??? कारण तुम्ही पैसे मोजलेले असता. मग इथे का नाही ?? कारण ते दुसऱ्याने दिले म्हणून का ?? “
” आणि हो , यातील काहीही यजमानांना माहित नाही . हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका . पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा, नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा .”
मला काही सुचेना काय बोलावे . थोडी लाजही वाटली आणि पटतही होते —-
खरेच भारतातच काय, आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकताहेत आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय ….
इतक्यात सौ .म्हणाली “बरोबर बोलताय भाऊ , यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे , तेव्हा करण्याला किती वेदना होतात . द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला . आता रात्रीचे जेवण होईल . मेहनत , इंधन सर्व काही वाचेल .
थोड्या वेळाने आम्ही वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो ….
(आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता….
एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच….
पण भूभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही )
—अन्नावाचून , अन्न पिकवता आत्महत्या करतोय …
अन्न हे पूर्णब्रम्ह – ते वाया घालवू नका. 🙏
संग्राहक : विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667