? वाचताना वेचलेले ?

☆ ती आणि लाॅकडाऊन… ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

कोरोना आला, आणि स्वयंपाकघर हे केवढं कला दालन आहे हे कळलं. 

 एवढ्याशा ओट्याच्या मंचावर किती मैफिली रंगतात. कढया,पातेल्या,झारे,पळ्या,शेगडी,तेल,डाळी,पीठं मुके नाहीत. ते बोलतात ,पण त्याची रूचिर भाषा आपण इतके वर्ष ऐकली नाही. कारण त्या रंगदेवतेकडे, स्त्रीकडे आपण दुर्लक्ष केलं. राजाचा मुकूट प्रधान घालत नाही आणि प्रधानाचा मुकूट राजा ! तसं हात, भांडी, ओटा पुसायचे फडकेही वेगळे असतात.  स्वच्छता हेच ध्येय पण भूमिका वेगवेगळ्या !  

पट्टीचा गायकीवर हुकूमत असलेला गायक जसा जरा असंबद्ध होत नाही. तसं कितीही मोठी तान घेऊनही, भांडी पुसायचं फडकं ती हात पुसायला वापरत नाही. साधी बाटल्यांची बुचंही अदलाबदल करायला घाबरतात तिच्या प्रेमापोटी ! उकळत्या दूधाचं भांडं पकडीत पकडून, दुसऱ्या हातानं साय अडवून, दूध कपाबाहेर न सांडता चहा नितळ ठेवण्याएवढी मोठी कला नाही. आपल्याला चहा पुन्हा गाळावा लागेल नि ओटा पुन्हा एकदा पुसावा लागेल. एकाच वेळी दुधाला उतू जाऊ न देणं नि लेकराला धडपडू न देणं,  ही विश्वाला थक्क करणारी सर्कस वा कसरत तीच करते. पाणी प्रमाणात झेपेल एवढा घोट घेतला तर तहान भागवतं नाहीतर ठसका लागतो. तसा गॅसही ! तो गरजेप्रमाणे कमी जास्त ठेवावा लागतो.  त्याच्या ज्वालेचं प्रमाण बटणावर नसतं. अन्नपूर्णेच्या प्रतिभेवर असतं.

प्रत्येक गोष्ट ती खाऊन पहात नाही. रंग,वास यावरून तिला अंदाज येतो. अंदाज हा माझा पुरुषी अहंकार. अंदाज नसतो, खात्रीच असते ती. आमचा असतो तो अंदाज आणि त्याना असते ती खात्री. अंदाज आणि खात्री यात दडलेली बाई आपण पहात नाही, तेवढा वेळ या कलामंदिरात रहात नाही.

 नेहमी लागणाऱ्या वस्तू मंचावर नि कधीतरी लागणाऱ्या उंचावर, हे तिचं शहाणं नि व्यवहार्य व्यवस्थापन असतं.

ती स्टूलही आणून ठेवते, नि हाक मारते, “अहो,एवढं काढून द्याल का?” आज्ञा आणि विनंतीतलं अंतर म्हणजे माया.  ते ती जपते, पण हातातला पेपर नि त्यातल्या उठाठेवीत ही मायेची ठेव विसरत आपण कुरकुरतो. ती कुरकूर तिच्या तरल संवेदनांना कळते.  आपल्याला फक्त पापडाची कुरकुर कळते.  स्वयंपाकघर ही खोली किती खोल आहे ते ज्याला कधीच कळत नाही, तो पुरुष.  

सर्वात लहान खोली स्वयंपाकाची, त्याहून लहान देवाची.  

एक विश्वाचा स्वयंपाक करते तर दुसरीचं विश्वच स्वयंपाक!

दिवाणखाना मात्र मोठा….परक्यांसाठी. आपल्यांसाठीचा विचार आपण घर बांधतानाही करत नाही. म्हणून नंतर तिला स्मरत नाही !

बेल दिवाणखान्यात वाजते, पण ती फोडणीच्या आवाजातही ऐकू जाते ती याच स्त्रीला. कारण ती पूर्ण घर आतून आपलं मानते.  सारखं करणं या शब्दात * सारखं म्हणजे सतत वा सारखं म्हणजे नीट करणं.*  पण तीच सगळं सतत नीट करत असते.  नुसतं एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता जाता ती दरवाज्यावरचा टॉवेल सारखा करते, गादीवरचा पलंगपोस सारखा करते. 

पसरणं नि आवरणं, ही क्रियापदं नाहीत, कृती नाही. तर ती वृत्ती आहे –पहिली आपली, दुसरी तिची ! 

आपण पसरायचं, तिनं आवरायचं !

तिच्या दमण्याचा आवाज कधी ऐकणार आपण? लक्षात ठेवा, असं मुलांचं वेळापत्रक, होमवर्क, नवऱ्याचे कपडे, गोळ्या आणि गाड्यांच्या वेळाही लक्षात ठेवणारं स्वयंपाकघर घराबाहेर पडतं , तेव्हा खरं लॉकडाऊन होतं !

” बाहेर ऊन, तर घरात चूल ” , ही फक्त घामाची वेगवेगळी कारणं !  

ठेच लागली तरी डोक्यावरची घागर, आणि ” कमरेवरचं भविष्य ” जी खाली ठेऊ शकत नाही, तिच्याहून मोठी विवेकाची नि सहनशीलतेची कला कुणाला जमणार? 

—-ती थांबेल, तेव्हा पृथ्वीच नाही, त्रैलोक्य लॉकडाऊन होईल !

संग्राहिका : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments