श्री विनय माधव गोखले
वाचताना वेचलेले
☆ कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 1 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
( ही घटना साधारण २२ वर्षांपूर्वीची आहे याची कृपया नोंद घ्यावी. )
जवळपास एक वर्ष उलटले आहे. हिमाचल प्रदेश राज्यातील एका खेड्यातून एक पत्र संरक्षण मंत्रालयाकडे आले. पत्र लिहिणाऱ्याने स्वत:चा परिचय शाळेतील एक शिक्षक म्हणून करून दिला होता …..
पत्रात ते लिहितात, की त्यांच्या एकमेव पुत्राला कारगिल युद्धामध्ये वीरमरण आले होते, आणि त्याचा पहिला स्मृतिदिन काही दिवसातच, म्हणजेच ०७/०७/२००० रोजी येत आहे, आणि जर शक्य असेल तर त्याच्या या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, त्याला जेथे विरमरण आले ती जागा त्यांना व त्याच्या पत्नीला बघायची इच्छा आहे. जर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हे शक्य होणार नसेल तर ते आपली विनंती मागे घेण्यास तयार आहेत, असाही उल्लेख त्यांनी पत्रात केला होता.
हे पत्र वाचणाऱ्या संरक्षण मंत्रालयातील विभाग अधिकाऱ्याने विचार केला की मंत्रालयाकडून तर अशा भेटीच्या खर्चाची परवानगी मिळणार नाही, परंतू या वीरमाता- वीरपित्याच्या भावना व त्याग बघता त्यांच्या या प्रवासाचा व भेटीचा खर्च या अधिकाऱ्याने स्वतःच्या पगारातून करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आदेश जारी केला.
या शूरवीराच्या हुतात्मादिनाच्या दिवशी या वयोवृद्ध वीरमाता- वीरपित्याला त्यांच्या एकुलत्या एक पुत्राला जेथे वीरमरण आले त्या जागेवर सन्मानाने आणण्यात आले. तेथे हजर असलेल्या सर्व सैनिकांनी सावधान होऊन त्यांच्या सन्मानार्थ कडक सलामी दिली.
तिथे फक्त एकच सैनिक असा होता ज्याच्या हातात खूप फुलं होती. त्याने शिक्षकांच्या पायांवर डोके ठेवले आणि फुलं वाहिली. त्याने आपले डोळे पुसले आणि नंतर तो इतरांसारखाच सावधान उभा राहून त्यानेही कडक सॅल्यूट ठोकला.
शिक्षकाला आश्चर्याचा धक्का बसला आणि ते म्हणाले… “ तुम्ही एक सन्माननीय अधिकारी आहात… तुम्ही माझ्या पायांना का स्पर्श केला व पाद्यपूजा का केली ..? तुम्हीही इतरांप्रमाणे सलामी देऊ शकला असतात आणि मी त्या सॅल्युटला प्रतिसाद दिला असता..! ”
“नाही सर. येथे मी इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे, म्हणजे येथे प्रत्येकजण ड्यूटीवर सज्ज आहे आणि मागील एक वर्ष किंवा त्याहूनही कमी काळात येथे नियुक्त झालेले आहेत.”
“मी तुमच्या शूरवीर मुलाबरोबर त्याच रेजिमेंटमध्ये होतो , त्याच डोंगराळ भागातील कड्यावर पाकिस्तानी शत्रूसमवेत लढा दिला होता, आणि स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी तुमच्या मुलाचा वीरतापूर्ण पराक्रम बघितला होता. आणि फक्त हेच नाही….. ” तो काही क्षण बोलायचं थांबला …..
शिक्षकांनी त्या सैनिकाचा हात धरला आणि म्हणाले, “ मला सांगा… जे काही मनात असेल ते कुठलाही किंतु न बाळगता मला सांगा… मी रडणार नाही…..”
“ मला माहित आहे तुम्ही रडणार नाही सर… पण मीही रडायला नको ना ….” तो सैनिक पुढे म्हणाला….
“ त्या तिथेच पाकिस्तानी सैनिक त्यांच्या हेवी मशीनगनने मिनिटाला शेकडो गोळ्या झाडत होते. आम्ही पाच जण सावधपणे साधारण तीस फुटांच्या अंतरापर्यंत पुढे सरकलो आणि त्या मोठ्या दगडाच्या आडोशाला कानोसा घेत कसेबसे उभे राहिलो. पाकिस्तानी सैनिकांची आमच्यावर नजर होती. त्यांना बहुधा आमच्या हाता- पायांचा किंवा पाठीवरील सामानाचा थोडाफार भाग दिसत असेल व ते आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यास तत्पर होते. अजून ब्रिगेडच्या इतर सैनिकांची कुमक येण्यास विलंब होत होता. काय करावे ते आम्हाला सुचत नव्हते.. !! मग …. ” त्या सैनिकाने एक सुस्कारा सोडला.
” पुढे काय झालं..? ” शिक्षकाने विचारणा केली…
क्रमशः…
संग्राहक : विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667