श्री विनय माधव गोखले
वाचताना वेचलेले
☆ कॅप्टन विक्रम बत्रा – भाग – 2 ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆
(“पुढे काय झालं..? ” शिक्षकाने विचारणा केली… ) इथून पुढे —–
सैनिक पुढे म्हणाला, ” मी म्हणालो, ” त्यांचा गोळीबार चालूच राहील… वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही… मी हे उरलेले तीस फुट अंतर जिवावर उदार होऊन जातो, म्हणजेच मी शत्रूला सामोरे जात त्याच्या गोळ्या अंगावर झेलत त्यांच्या खंदक (बंकर) कडे पळत जातो आणि हातबाॅम्ब (ग्रेनेड) टाकून तो उध्वस्त करतो. बंकर नष्ट झाल्यावर तुम्ही सर्व त्याचा ताबा घ्या.”
मी हातात हातबाॅम्ब (ग्रेनेड) घेऊन शत्रूच्या खंदकाकडे पळण्यास सज्ज होताच तुमच्या मुलाने माझ्याकडे पाहिले व म्हणाला ‘ तू वेडा आहेस का..? तुझी बायको आणि मुलं तुझ्यावर अवलंबून आहेत…. आणि मी अद्याप अविवाहित आहे. मी शत्रूला सामोरे जातो आणि तू मला संरक्षण (कव्हरिंग) दे,’– आणि उत्तराची वाट न पाहता, जबरदस्तीने माझ्या हातातून ग्रेनेड हिसकावून तो शत्रूच्या बंकरच्या दिशेने पळत सुटला.”
“ पाकिस्तानी हेवी मशीनगन (H.M.G.) च्या संततधार पावसासारख्या गोळ्या बरसल्या. आपल्या मुलाने तो गोळीबार चुकवत पाकिस्तानी बंकर गाठला आणि ग्रेनेडची पिन काढून तो थेट बंकरमध्ये टाकला व तेरा पाकिस्तानी सैनिकांना यमसदनास पाठवले. हेवी मशीनगनमधून गोळ्यांचा वर्षाव बंद झाला आणि ते क्षेत्र आमच्या नियंत्रणाखाली आले.”
“ सर्वप्रथम तुमच्या मुलाचे शरीर उचलून बाहेर आणणारी मी पहिली व्यक्ती आहे. सर, त्याच्या शरीरात बेचाळीस गोळ्या घुसल्या होत्या. सर. मी त्यांचे डोके हातात धरले, त्यानंतरच त्याने शेवटचा श्वास घेतला. “
“ मी आपल्या वरिष्ठांना, तुमच्या गावी त्याचे पार्थिव पोहोचवण्याची जबाबदारी मला देण्याची विनंती केली. परंतु सर., मला नकार देण्यात येऊन दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण कामगिरीवर मला पाठविण्यात आले.”
“कदाचित मला या शूरवीराला त्याच्या अंतिम यात्रेत खांदा देण्याचा बहुमान मिळाला असता व मी ही फुले त्याच्या पायावर वाहिली असती. ते मी करू शकलो नाही. पण मला ही फूलं तुमच्या पायावर वाहण्याची संधी तरी मिळाली सर. ” आणि त्या सैनिकाने एक उसासा टाकला.
शिक्षकाची पत्नी साडीचा पदर तोंडावर लावून मूक अश्रू ढाळीत होती. शिक्षक रडले नाहीत. त्यांनी त्या सैनिकाकडे गांभीर्याने पाहिले आणि सैनिकानेही अश्रू ढाळले नाहीत आणि त्याने शिक्षकाकडे बघितले.
शिक्षकाने नक्की काय विचार केला हे माहित नाही. आपल्या खांद्यावरील पिशवीतून त्याने एक पुडके बाहेर काढले आणि त्या सैनिकाला दिले व ते म्हणाले, “ माझा मुलगा सुट्टीवर येणार होता तेव्हा त्याच्यासाठी मी सदरा विकत घेतला होता. पण तो आला नाही. आणि आली… त्याच्या वीरमृत्यूची बातमी…”
“आता तो सदरा कोण घालेल ? … जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला तेथे ठेवण्यासाठी मी तो सदरा घेऊन आलो होतो. कदाचित माझ्या मुलाचा आत्मा याठिकाणी कधीतरी येईल व तो सदरा घालेल अशी माझी श्रद्धा होती. परंतू आता मला माहित आहे की हा सदरा कुणी घालायचा आहे ते. नकार न देता कृपया हा घ्या.”
त्या सैनिकाच्या डोळ्यातून आता मात्र अश्रूंचे पाट वाहू लागले. तो पुढे सरसावला व त्याने तो सदरा असलेले पुडके स्विकारले.
त्या कारगिल हिरोचे शेवटचे शब्द होते “ जय हिंद ।”
आत्ता हे जाणण्याची वेळ आली आहे …..
कारगिल हिरोचे नाव: कॅप्टन विक्रम बत्रा.
हिरोच्या वडिलांचे नाव: गिरधारी लाल बत्रा.
हिरोच्या आईचे नाव: कमल कांता.
माझ्या प्रिय मित्रांनो, हे लोक आमचे वास्तविक नायक आहेत.
या बलिदानाचा इतिहास आपण कायम स्मरणात ठेवू या.
Celebrate the Real Activists and not Just Celebrities.
हुतात्मा कॅप्टन विक्रम बत्रा, आम्हाला तुमचा अभिमान आहे.
जयहिंद.
संग्राहक : विनय माधव गोखले
भ्रमणध्वनी – 09890028667