सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सदगुरु ही एकच व्यक्ती नसते, नसावी— बा. भ. बोरकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

सद्गुरू ही एकच  व्यक्ती नसते ; नसावी ! गुरु केवळ मानवस्वरुपातच असतो असेही नाही ! सारी सद्गुणी माणसे आपल्यासाठी गुरुवत् असतात . कधी एखादे पुस्तक , एखादे मूल्य , एखादे तत्व , एखादा अनुभव आपल्याला बरेच काही शिकवीत असतो . एखाद्याला गुरुपण दिले तरी ते डोळस असावे ! असा प्रवास करत जाता आपण पोहोचतो विवेकापर्यंत ! म्हणूनच बोरकर आठवतात ! 

देखणे ते चेहरे 

जे प्रांजळाचे आरसे

गोरटे वा सावळे 

या मोल नाही फारसे !

तेच डोळे देखणे 

जे कोंडिती सार्‍या नभा

वोळती दुःखे जगाच्या 

सांडिती चंद्रप्रभा !

देखणे ते ओठ जे 

की ओविती मुक्ताफळे

आणि ज्यांच्या लाघवाने 

सत्य होते कोवळे !

देखणे ते हात 

ज्यांना निर्मितीचे डोहळे

मंगलाने गंधलेले 

सुंदराचे सोहळे !

देखणी ती पाऊले 

जी ध्यासपंथे चालती

वाळवंटातून सुध्दा 

स्वस्तिपद्मे रेखिती !

देखणे ते स्कंध ज्या ये 

सूळ नेता स्वेच्छया

लाभला आदेश प्राणी 

निश्चये पाळावया !

देखणी ती जीवने 

जी तृप्तीची तीर्थोदके

चांदणे ज्यातून फाके 

शुभ्र पार्‍यासारखे !

देखणा देहान्त तो 

जो सागरी सूर्यास्तसा

अग्निचा पेरून जातो 

रात्रगर्भी वारसा !!!

~ बा. भ. बोरकर

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest


0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments