वाचताना वेचलेले
गाद्या घालणे… अज्ञात ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆
पूर्वी रात्रीची जेवणं आठ साडेआठ च्या सुमारास होत असत.साडेनऊ पर्यंत दिवे मालवून रेडिओवरची श्रुतिका ऐकत किंवा कधी रात्री दहाची आकाशवाणी संगीतसभा ऐकत लोक झोपेच्या आधीन होत.तत्पूर्वी गाद्या घालणे हे नित्य काम करावे लागे.तेंव्हा घरात एक किंवा दोन पलंग असत.खर म्हणजे लोखंडी ,उभ्या आडव्या पट्ट्या असलेलली एकच कॉट असे.२/३ खोल्यांच्या लहान घरात जागाही नसे आणि प्रत्येकाने कॉटवर झोपण्याची चैन करण्याची पद्धतही नव्हती.सिंगल बेड,डबल बेड,सोफा कम् बेड,बंक बेड चा तो जमाना नव्हता.त्यामुळे घरातील ती एक कॉट वडिलांसाठी राखीव असे.ते घरात नसतील तेंव्हा दुपारी पडायला वगैरे इतरांना ती मिळे.त्यामुळे रात्री घरातील इतर सर्वांनी खाली गाद्या घालून झोपायचं हे ओघानेच आले.
घरात भिंतीला टेकवून ३/४ गाद्यांच्या वळकट्या एकावर एक रचून ठेवलेल्या असत.त्यावर एखादी सतरंजी किंवा चादर घातलेली असे ज्यायोगे गादीतला क्वचित् उसवून बाहेर आलेला कापूस दिसू नये.गाद्या घालण्यापूर्वी पुन्हा एकदा झाडून घ्यायचे.पूर्वी दोन वेळा केर काढायची पद्धत होतीच. फक्त दिवेलागणीला केर काढायचा नाही असा नियम होता.कारण ती वेळ घरात लक्ष्मी येण्याची वेळ.केर काढल्यावर सतरंज्या अंथरायच्या आणि त्यावर गाद्या पसरायच्या.गाद्या घालायचं काम सामान्यपणे घरातली पुरुषमंडळी करत आणि लहान मुले त्यांना आवडीने मदत करत.गादीवरची चादर काढून त्या चादरीने गादी जोरजोरात झटकायची. ढेकणांचाही बंदोबस्त करावा लागे..मग त्यावर हळुवारपणे चादर पसरायची.चादरीची एका बाजुची दोन टोके एकाने पकडायची आणि दुसरी दोन टोके दुस-याने पकडून हळुहळु चादर खाली आणून गादीवर अंथरायची.त्यावेळी चादरीत हवा भरुन मोठा फुगा होत असे.मग गादीवर रांगत रांगत चादरीच्या चारही बाजू ताणून ,निगुतीने गादीखाली दुमडून टाकायच्या.एकही सुरकुती तिथे असता कामा नये यावर वडिलांचा कटाक्ष असे.हे सगळं करताना घरातलं लहान मूल वडिलांच्या पाठीवर घोडा घोडा खेळत असे.घोड्यावरुन गादीवर रपेट मारली जात असे.मुलं कोलांट्या उड्या मारत .हा खेळ रोज चाले.म्हणून गादी घालणे हे मुलांनाही काम वाटत नसे तर उलट त्यांच्या मौजेचा भाग वाटे.शेवटी डोक्यापाशी उशा आणि पायापाशी पांघरायची चादर ठेवली की हे काम पूर्ण होत असे.गादीवर अंथरायची ‘बेडशीट ‘च असे अस काही नाही.आईची किंवा आजीची जुनी मऊ नऊवार साडीसुद्धा पांघरायला असे.हे सगळं झालं की वडिलांच्या पाठीवर पाय देणे असा एक कार्यक्रम असे.भिंतीचा आधार घेऊन आम्ही वडिलांच्या पाठीवर पाय देऊन त्यांची पाठ रोज रगडून देत असू.आईच्या वाट्याला कधीच हे कौतुक आले नाही.पण तरी ती मात्र न चुकता रोज झोपायच्या वेळी आमच्या तळपायाला साजूक तूप लावून देत असे, थंडीत पायांच्या भेगा कोकम तेलाने बुजवत असे,उन्हाळ्यात वर्तमानपत्राच्या घडीने झोप येईपर्यंत वारं घालत असे…सगळं निरपेक्ष …शेवटी आई ती आईच.
आपण सर्व ह्या अनुभवाचा आनंद आज ही आठवणीत साठवलेला असेलच !!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈