सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

 

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ वसा ई-साक्षरतेचा… सुश्री अनुज्ञा बर्वे ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

श्रावण महिन्यातल्या कहाण्या ऐकणं ही पर्वणी असे माझ्या लहानपणी !

तशा ढंगात आधुनिक कथुली लिहिण्याचा हा एक प्रयत्न– यंदाच्या श्रावणमासारंभानिमित्ताने —-

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट !

(२१व्या शतकात आठेक  वर्षापूर्वीची म्हणजे फार फार्रच!  राईट?)

आटपाट सहनिवासात एक कुटुंब रहात असे. त्यातले राजा -राणी नि दोन राजपुत्र आधी अगदी आनंदाने रहात. जसजसे राजपुत्र राजाच्या पावलावर पाऊल टाकून  शिक्षणात यशस्वी होत गेले, तसतसे ते राजाच्या मर्जीत राहू लागले आणि…..

ई-युगात  राणी मात्र हळुहळु मागे पडत गेली (खरंतर मागासलेली ठरली), नि त्या त्रिकुटाची नावडती झाली.

यथावकाश, शिक्षणाच्या मोहिमेसाठी राजमान्यतेने दोन्ही राजपुत्रांनी देशांतर केलं.

राजा नि राजपुत्रांचं त्रिकुट ई-संवादा ने आणखी घट्ट जोडलं गेलं.

राणी मात्र नावडतेपणाने दुरावत गेली.

राजपुत्र मोहिमेवर गेल्यानंतरच्या पहिल्या श्रावणात तिनं पुत्रांच्या क्षेम-कल्याणासाठी व्रतवैकल्यं

करायचं योजलं. त्यातल्या देवांच्या कहाण्यां मधून राणीला प्रेरणा मिळाली नि तिनं वसा घेतला-

स्वत:साठीही !

सर्वप्रथम राणीने आपल्या खाजगी ठेवी तून वशासाठी लागणारं एकमेव साहित्य, (अगदी पारंपरिक कहाण्यातल्या एक मूठ साहित्यासारखं) म्हणजेच स्मार्टफोन खरेदी केला. देवांच्या कहाण्यांनी प्रेरित झालेल्या राणीला पतिदेव सहाय्य करतील असा भरवसा नव्हताच मुळी !

त्यामुळे—सहनिवासात राहणाऱ्या नि रोज सायंवॅाक घेणाऱ्या एका नवयौवना उमेशी जवळीक साधली.

उमेनंही, राणीला सखी म्हणून स्वीकारलं.

नंतर श्रावणातल्या दर सोमवारी सहनिवासाच्या कट्ट्यावर ह्या सखी-पार्वतीच्या जोडीनं चौसोम (४ सोमवारची) योजना आखली. राणीनं, ई-तंत्र-संथा घ्यायचं निश्चित केलं.

पहिल्या सोमवारी काय घ्यावं?—-

मुठीतल्या मोबाईलला मनोभावे नमस्कार करून राणीने संपूर्ण मोबाईल-कार्य नि ई-जोडणी आत्मसात करून घेतली ,— उमे कडून !

मग दुसऱ्या , तिसऱ्या , चौथ्या सोमवारी उमेच्या समक्ष सहाय्याने, ई-मेल, व्हाट्सअप, फेसबुकमध्ये लक्ष वाहिलं राणीने !!—’ उतणार नाही मातणार नाही । घेतला वसा टाकणार नाही ।। ’  हे ब्रीद वाक्य ठेवून राणीने उपासना सुरूच ठेवली.

राजपुत्रांना पहिल्यांदा ‘मेल’ करून ई-धक्का देत देत हळूहळू राणी ई-स्मार्ट तर झालीच, –

पण…

आत्तापर्यंत ‘राजपुत्र’ हीच दुनिया असलेल्या राणीच्या कक्षा रुंदावल्या नि ती संपूर्ण जगाशी जोडली गेली.

वसा फळाला आला . — * राजा आणि राजपुत्रांची* कमालीची आवडती झाली राणी !

(जसा जसा वसा परिपक्व होत गेला तसा तसा  राणीचा नेट पेमेंट शॅापिंगवरचा दहशतवादी  वरचष्मा राजाच्या नजरेत भरू लागला.)

नेटचे निर्मळ मळे, गुगलचे तळे,

फेसबुकचा वृक्ष, व्हाट्सअप-इन्स्टाग्रामची देवळे रावळे.

मुठीतला मोबाईल मनी वसावा. संपूर्ण ई-साक्षर व्हावं —

संपूर्णाला काय करावं? ॲानलाईन अल्पदान करावं.—

ही बोटाच्या टोकावर उत्तरं असणारी कहाणी सुफळ संपूर्ण

हा वसा कुणी घ्यावा ? –काळाबरोबर राहू इच्छिणाऱ्या कुणीही घ्यावा –नि घेतला वसा टाकू नये.

लेखिका : अनुजा बर्वे

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest


0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments