श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? वाचताना वेचलेले ?

☆ ऋतु गाभुळताना… सौ विदुला जोगळेकर ☆ संग्रहिका – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

ऋतु गाभुळताना…

झोपता झोपता दुरदर्शन बातमी देतं..मान्सून एक जुनपर्यंत केरळ मध्ये दाखल होणार..

मार्च,एप्रिल..२४तास एसी,कुलर,पंख्याला आचवलेलं शरीर..पहाटे पहाटे पायाशी असलेलं पातळ चादर बेडशीट, साखरझोपेत कधीतरी अंगावर ओढून घेतं…समजावं तेंव्हा ऋतु गाभुळतोय.

ऐटीत झाडावरुन मोहीत करणारे… बहावा, पलाश, गुलमोहर… वार्याच्या खोडसाळपणाने पायाशी पायघड्या पसरवू लागतात.झाडावरचं कैर्यांचं गोकुळ रिकामं होउन गेलेलं असतं, एखादा झाडावरच पिकलेला आंबा, खाली पडून केशर कोय सांडतो.  जांभुळ, करवंदाचा काळा, जांभळा रंग जमिनी रंगवू लागतो…तेंव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

आई आजीची लोणच्या, साखरंब्याची घाई, कोठीत धान्यं भरुन जागेवर ठेवायची लगबग, गच्ची  गँलरीत निवांत पहुडलेली चीजवस्तू, आडोश्याच्या जागी हलवायची बाबा आजोबांची गडबड… समजावं ऋतु गाभुळतोय.

ताटातला आमरस सर्रासपणे गोडच लागतो.. साखरची गोडी त्याला आता नकोशी होते. उरलेल्या पापडकुर्डया आता हवाबंद डब्यात जाउन बसतात, डाळपन्हं, आईस्क्रीम, सरबतं,सवयीची होत जातात.माठातल्या पाण्यात एखादी भर आताशी कमीच पडते. तेंव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

दुर्वास ऋषी च्या अविर्भावात आग ओकरणारा रवी.. काळ्या पांढऱ्या ढगांशी सलगी करु पाहतो, मेघनभात अडकलेली किरणं सोडवता सोडवता… असाच दमुन जातो. भास्कराचा धाक कमी झाल्याचं पाहुन वारा ही उधळतो. गच्ची, दोरीवरच्या कपडे, गाद्यांवर आता लक्ष ठेवावं लागतं.. तेंव्हा खुशाल समजावं.. ऋतु गाभुळतोय.

निरभ्र वाटणारं आकाश क्षणात आभाळ होउन जातं, उनसावलीच्या खेळात चराचर सावळं होतं वीज  रसपोळीनं सुस्तावलेली दुपार.. धावपळीची होते. झाडांवरच्या पक्षांची किलबिल.. किलबिल न राहता नव्या स्थलांतराची भाषा बोलू लागते.. उफाळत्या जमीनीत नांगर फिरु लागतात मोगर्याचे ताटवे विरळ होउ लागतात, मृदगंधाचे वास श्वासात विसावून जातात..  खुशाल समजावं तेंव्हा.. ऋतु गाभुळतोय.

उंबऱ्यावर आलेल्या त्या वर्षेला भेटण्यासाठी देहमनाने आपण ही आतुरतो…. तेंव्हा अगदी खुशाल समजावं…… ऋतु गाभुळतोय……

 

©️ सौ विदुला जोगळेकर

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments