सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 24 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
३५.
जिथं मन मुक्त असेल, माथा उन्मत्त असेल,
ज्ञान मुक्त असेल,
घरांच्या क्षुद्र भिंतींनी जगाचे तुकडे झाले नसतील,
सत्याच्या गाभाऱ्यातून शब्दांचा उच्चार होईल,
अथक परिश्रमांचे हात
पूर्णत्वाप्रत उंचावले जातील,
मृत सवयींच्या वालुकामय वाळवंटात
बुध्दीचा स्वच्छ झरा आटून गेला नसेल,
सतत विस्तार पावणाऱ्या विचार
आणि कृती करण्याकडेच
तुझ्या कृपेने मनाची धाव असेल,
हे माझ्या स्वामी, त्या स्वतंत्रतेच्या स्वर्गात
माझा देश जागृत होऊ दे.
३६.
माझ्या ऱ्हदयातील दारिऱ्द्य्याच्या
मुळावर घाव घाल
सुख आणि दुःख आनंदानं सोसायची
शक्ती मला दे.
माझं प्रेम सेवेत फलद्रूप करण्याची शक्ती दे.
गरिबापासून फटकून न वागण्याची अगर
धनदांडग्या मस्तवालासमोर शरण न जाण्याची
शक्ती मला दे.
दैनंदिन क्षुद्रतेला ओलांडून उंच जाण्याची
शक्ती मला दे आणि
प्रेमभावनेनं तुझ्या मर्जीप्रमाणं तुला शरण
जाण्याची शक्ती मला दे.
इतकीच माझी प्रार्थना आहे!
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈