जीवनरंग
☆ लेडीज फर्स्ट — भाग – 1 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆
शोभना, विजय आणि त्यांचा मुलगा रोहित, असं हे त्रिकोणी, सुखी दिसणारं कुटूंब. विजय बँकेत मॅनेजर, शोभना एका नावाजलेल्या शाळेत मुख्याध्यापिका.
शोभना म्हणजे शिस्तप्रिय, स्पष्टवक्ती आणि कामात अतिशय sincere अशी तिची ओळख होती. रोहित तिच्याच शाळेत आठवीत शिकत होता, पण कधीही त्याला शाळेत विशेष वागणूक मिळाली नाही, ना कुठेही शिस्तीत सवलत मिळाली.
शोभना रोज गाडीने शाळेत जात असे पण रोहित बाकीच्या मुलांबरोबर व्हॅनमधेच येत असे. शाळेत बऱ्याचशा मुलांना तर माहीतही नव्हते की रोहित आपल्या मुख्याध्यापक मॅडमचा मुलगा आहे म्हणून.
शोभनाने तिच्या कामाच्या आणि शिस्तीच्या बळावर शाळेला खूप चांगले नाव मिळवून दिले होते.
शाळेचा कामाचा ताण सांभाळूनही शोभनाने घराकडे दुर्लक्ष होऊ दिले नव्हते, विशेषतः रोहितचे खाणे, पिणे, त्याचा अभ्यास, कपडे अगदी कुठेही ती कमी पडली नव्हती.
विजय मात्र तिच्या अगदी विरुद्ध. बँकेचे काम आणि वेळ मिळाल्यास वाचन यामधेच त्याचा वेळ जात असे. घरातले काम करणे त्याला कधीच जमले नाही.
नाही म्हणायला तो कधीतरी कामात मदत करायचे ठरवायचा पण मदत होण्यापेक्षा गोंधळच जास्त होत असे. आणि ह्यावरून मात्र त्याला शोभना खूप बोलत असे. रागाच्या भरात कधीकधी अपमान देखील करत असे. असे झाले की मग तो गच्चीवर जाऊन एकांतात विचार करत बसत असे आणि आपण खूप अपराधी असल्याची भावना त्याच्या मनात येत असे.
रोहित मात्र असे प्रसंग पाहून खूप खिन्न होत असे.
परवा तसाच प्रसंग घडला. घरी पाहुणे येणार म्हणून शोभनाने विजयला बँकेतून येताना आंबे आणायला सांगितले. घरी आल्यावर शोभनाने ते आंबे पाहिले आणि खूप भडकली. “अहो तुम्हाला काही समजतं का? उद्या पाहुणे येणार आणि तुम्ही एवढे कडक आंबे घेऊन आलात? एक काम धड करता येत नाही.”
विजय म्हटला ,”अगं, मागच्या वेळी मी तयार आंबे आणले तरी तू रागावली होती म्हणून आज कडक आणले.”
“अरे देवा, काय करू या माणसाचं. अहो तेव्हा आपल्याकडे मुलं राहायला येणार होती, त्यांना पंधरा दिवस खाता यावे म्हणून कडक आंबे हवे होते. तुम्ही पुरुष ना, घरामध्ये शून्य कामाचे.”
आणि मग शोभनाची गाडी घसरली. “तुम्हा पुरुषांना तर काहीही करायला नको घरासाठी. घर आम्हीच आवरायचं, सगळ्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था करायची, मुलांची तर सगळी जबाबदारी स्त्रीचीच. तुमचा काय रोल असतो सांगा बरं, मुलांच्या जन्मात आणि संगोपनात ; ‘तो’ एक क्षण सोडला तर? मुलांना नऊ महिने पोटात वाढवायचं, आणि प्रसूतीसारख्या जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जायचं. बरं एवढ्यावरच सगळं थांबत नाही, जन्मानंतरही त्यांचं फीडिंग, त्यांचं सगळं आवरणं, मग थोडे मोठे झाल्यावर शाळा, अभ्यास, डबे सगळं सगळं स्त्रीनेच बघायचं, पुरुष कोणती जबाबदारी घेतो सांगा?”
विजय निरुत्तर. तरी शोभनाचं संपलेलं नव्हतं.
“तुम्ही काय फक्त पैसे कमवून आणता, पण आता तर स्त्रियासुद्धा काम करतात, त्यामुळे त्याचीही तुम्ही काही फुशारकी मारू शकत नाही.”
आज मात्र विजय खूपच दुखावला गेला, शोभनाच्या बोलण्यात agresiveness असला तरी तथ्य देखील होते. स्वतः अगदी useless असल्याची भावना त्याला येत होती.
तो आपल्या नेहमीच्या एकांताच्या जागी जाऊन बसला. तेवढ्यात रोहित खेळून आला व त्याने पाहिले, आपले बाबा एकटे गच्चीत बसले आहेत व त्याच्या लक्षात आले, काय घडले असेल ते.
असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी रोहित त्याच्या बाबांना म्हटला, ” बाबा, उद्या आमच्या शाळेत वक्तृत्व स्पर्धा आहे, मी पण भाग घेतला आहे. माझी इच्छा आहे तुम्ही पण यावे. येणार ना?”
विजयने होकार दिला. खरं म्हणजे त्याची कुठल्याही समारंभात जायची इच्छा नव्हती. पण रोहितचं मन राखण्यासाठी त्याने जायचं ठरवलं.
वक्तृत्व स्पर्धेत आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि स्पर्धेला विद्यापीठाचे कुलगुरु प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. शाळेसाठी आणि विशेषतः शोभनासाठी ही फार महत्वाची बाब होती. विषय होता
‘माझी सर्वात प्रिय व्यक्ती.’
भाषणं सुरू झाली. विजय शेवटच्या रांगेत बसला होता. मुलांनी खूप तयारी केली होती. जवळजवळ सगळ्या मुलांची सर्वात प्रिय व्यक्ती ‘आई’ च होती. खूप सुंदर भाषणं सुरू होती. बऱ्याचश्या मुलांना पालकांनी भाषण लिहून दिल्याचं जाणवत होतं, तरी मुलांची स्मरण शक्ती, बोलण्यातले उतार चढाव, श्रोत्यांच्या नजरेत बघून बोलणं, प्रत्येक गोष्ट खरोखर कौतुकास्पद होती.
क्रमशः…
लेखक : अज्ञात
संग्राहिका : बिल्वा अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈