श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ एक कागदाचं पान असतं…!! – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
कसं आहे ना?
एक कागदाचं पान असतं…!!
‘श्री’ लिहिलं, की पूजलं जातं …
प्रेमाचे चार शब्द लिहिले, की जपलं जातं…
काही चुकीचं आढळलं, की फाडलं जातं…
एक कागदाचं पान असतं…!!
कधी त्याला विमान बनवून भिरकावलं जातं…
कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जातं…
कधी भिरभिरं बनवून वाऱ्यावर फिरवलं जातं…
आणि कधी तर निरुपयोगी म्हणून चुरगाळलंही जातं…
एक कागदाचं पान असतं….!!
जे लेखकाच्या लेखणीला हात देतं…
जे चित्रकाराच्या चित्राला साथ देतं…
जे व्यापाऱ्याच्या हिशोबाला ज्ञात ठेवतं…
आणि हो, वकिलांसोबत कोर्टात गेलं, की साक्षही देतं…
एक कागदाचं पान असतं…..!!
पेपरवेट ठेवला, की एकदम गप्प बसतं…
काढून घेतला, की स्वच्छंदी फिरतं आणि
कशांत अडकलं, तर फडफडायला लागतं…
एक कागदाचं पान असतं…..!!
ज्यावर बातम्या छापल्या, की वर्तमानपत्र बनतं…
प्रश्न छापले, की प्रश्नपत्रिका बनतं…
विवाहाचं निमंत्रण छापलं, की लग्नपत्रिका बनतं…
तर कधी आदेश~संदेश लिहिले, की तेच टपालही बनतं…
एक कागदाचं पान असतं….!!
माणसाच्या जीवनांत आणि त्यांत खूप साम्य असतं…!!
एक कागदाचं पान असतं…!!
जन्माला आला तर birth certificate असतं
निधन पावला तर Death certificate असतं
एक कागदाचं पान असतं ——–
– अज्ञात
संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈