श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ वय असतं का पावसाला?☔ ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
हो असतं की…….
मऊ दुपट्यात आईच्या खांद्यावरून बघताना पाऊस एक वर्षाचा असतो.
वाजणारे बूट मुद्दाम डबक्यात आपटत चालताना पाऊस चार वर्षाचा असतो..
शाळेतून येताना छत्री मुद्दाम वाऱ्याच्या दिशेने धरून उलटी करताना पाऊस बारा वर्षाचा असतो..
ट्रेकिंग करताना चिंब भिजल्यावर टपरीवर चहा पिताना पाऊस टीन एज ओलांडत असतो..
तिला पाऊस आवडतो, रिमझिम गिरे सावन वगैरे गाणी ऐकताना अपरिहार्यपणे पाऊस गद्धे पंचविशीत असतो.
भिजायला नको वाटायला लागलं की पन्नाशी येते पावसाची..
गुडघे दुखू लागले की साठीशांत होते पावसाची..
नंतर नंतर पाऊस मफलर कानटोपी गुंडाळून काठीच घेतो हातात ,आणि नातवंडांना ओरडतो पण, की अरे भिजू नका रे पावसात..
आपल्यासोबत बदलत जाणारी पावसाची रूपं पाहिली की मनात येतं…
किती पहावा पाऊस
धुके चष्म्यात दाटले
किती गेले पावसाळे
थोडे डोळ्यात उरले..
वय पावसाला नाही
वय मला भिववीते
अशा सर्दाळ हवेत
संधी वाताला मिळते.
संग्राहक – अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com