सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 27 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
७.
5 वाचताना वेचलेले:
भावार्थ गीतांजली…. प्रेमा माधव कुलकर्णी
गीतांजली भावार्थ
४१.
तुझे अस्तित्व नाकारून ते तुला धुडकावतात,
धूळभरल्या पथावरून तुझ्या बाजूने जातात,
पूजासाहित्य पसरून
मी किती वेळ तुझी वाट पाहतोय.
येणारा – जाणारा माझी फुलं घेऊन जातो.
माझी फुलांची दुरडी बहुधा रिकामी झाली.
सकाळ गेली, दुपार गेली,
सायंसमयी झोपेनं माझे डोळे
आता जड होऊ लागलेत.
घराकडे परतणारे माझ्याकडे दृष्टिक्षेप टाकतात,
मला हसतात. मी शरमते.
माझा पदर चेहऱ्यावर ओढून मी भिकारणीप्रमाणं बसते.
ते मला प्रश्न विचारतात,
“काय पाहिजे?”
तेव्हा मी नजर वळते.
त्यांना काय सांगू?
माझ्या सख्या,या सर्वांमागे सावलीत
तू कुठे आहेस?
त्यांना काय सांगू? ‘येणार’ असं मला आश्वासन दिलंस आणि मी तुझी वाट पाहतेय.
हुंड्यासाठी हे दारिद्र्य मी जपलंय असं कसं सांगू?
ते मनातच मी ठेवलंय, बंदिस्त केलंय.
या गवतावर बसून आकाशाकडे
टक लावून पाहत राहते.
सर्वत्र प्रकाश भरून राहिलाय.
तुझ्या रथावर सोनेरी पताका फडफडताहेत.
आ वासून रस्त्याच्या कडेला थांबून
ते सगळेजण पाहताहेत. . . .
आणि तू येत आहेस.
तू रथातून उतरून येशील. वासंतिक वाऱ्यानं
थरथरणाऱ्या पाण्याप्रमाणं फाटक्या कपड्यातील ही भिकारी मुलगी धुळीतून उचलून तुझ्या शेजारी
बसवून घेशील.
हे ते अवाक होऊन पहात राहतील.
वेळ सरकत राहतो, पण तुझ्या रथाच्या चाकांचा आवाज नाही!
विजयाच्या घोषणा देत,
गोंगाट करीत किती मिरवणुका गेल्या.
या सर्वांच्या मागे तूच होतास का?
निरर्थक इच्छा करीत उरस्फोट करीत,
तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेली ती मीच का?
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈