सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ घर खरचं कोणामुळे फुटते… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

बहुतेक वेळा याचे खापर स्त्रियांच्या माथी मारले जाते. पण कोणाचेही घर एकट्या स्त्रीमुळे फुटत नाही, तर ते फक्त स्वार्थामुळे फुटत असते, आणि तो स्वार्थ कुटुंबातील स्त्री , पुरुष यापैकी कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो . 

मनात स्वार्थ निर्माण झाला की त्याला फक्त समर्थनाची गरज असते. मग पतीला समर्थन देणे हे पत्नीचे कर्तव्य असते.  आणि असे कर्तव्य पार पाडण्यासाठी स्त्री अतिउत्साही बनते आणि सर्वांच्या डोळ्यावर येते. खरेतर हा फक्त धूर असतो, स्वार्थाची आग पुरूषाच्या हृदयात लागलेली असते. माणसाला दुरुन धूर दिसतो ,आग दिसत नाही .

स्त्रीने कितीही प्रयत्न केला, तरी  घरातील पुरूष निःस्वार्थी आणि खंबीर असेल, तर तिला घर कधीच फोडता येत नाही. 

कैकयीच्या मनात स्वार्थ उत्पन्न झाला, पण दशरथ निःस्वार्थी होते. त्यांनी जीवन संपवले, पण घर फुटू दिले नाही.  

वडिलांच्या आज्ञेनुसार स्वतःची काहीच चूक आणि दोष नसताना श्रीराम यांनी वडलांच्या वचनासाठी विनातक्रार आनंदाने वनवास स्वीकारला, पण भरतानेही त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेऊन सेवकाप्रमाणे राज्य सांभाळले, कारण हे सर्व पुरुष निःस्वार्थी होते. कैकयीच्या स्वार्थाचा आणि प्रयत्नांचा काहीही उपयोग झाला नाही. उलट तिलाच घरात एकटे रहावे लागले आणि आयुष्यभर निंदा सहन करावी लागली.

पुरुष निःस्वार्थी असेल तर जगातील कोणत्याही स्त्रीला घर फोडता येत नाही.  पण जर पुरुष स्वार्थी बनला तर कोणत्याच स्त्रीला घर एकत्रित ठेवता येत नाही हेही तितकेच खरे आहे. 

धृतराष्ट्राच्या मनात स्वार्थ उत्पन्न झाला. गांधारी आणि कुंती या दोघींनाही स्वार्थ नव्हता. या दोघींनीही घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला. पण त्यांनाच काय,  भगवान श्रीकृष्णांनी प्रयत्न केला तरीसुध्दा घर आणि कुळ वाचवता आले नाही. पुरुषाच्या मनात स्वार्थ निर्माण झाला तर देवालासुध्दा घर वाचवता येत नाही.  यात स्त्रियांना दोष देऊ नका.

एक भाऊ दुसऱ्या भावाची जेवणासाठी वाट पहातोय, हा आईवडीलांसाठी सर्वात सुख आणि समाधानाचा क्षण असतो आणि आईवडील हयात असताना घराच्या  वाटणीचा दिवस हा त्यांच्या जीवनातील सर्वात दुःखद क्षण असतो .

याबाबतीत त्यांना सुख द्यायचे की दुःख द्यायचे हे सर्वस्वी मुलांच्या हातात– म्हणजेच त्यांच्या मनातील स्वार्थावर अवलंबून असते.

म्हणूनच आपल्या स्वार्थासाठी उगीचच फक्त घरातील स्त्रीला बदनाम करू नका. 

घर कधीच फक्त स्त्रियांमुळे फुटत नाही, तर ते एका कुणाच्या स्वार्थामुळे फुटते. आपल्या घराचे घरपण हे बहुतांशी स्त्रीमुळे टिकून असते.  ज्या घरातील पुरुष आणि स्त्री दोघेही खंबीर व निस्वार्थी असतात , त्यांचे घर कधीही फुटू शकत नाही हे नक्की. 

 

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments