? वाचताना वेचलेले ?

☆ रोज थोडाथोडा मरतोय – कवयित्री : सुश्री रश्मी  त्रिवेदी – मुक्तानुवाद :श्री सॅबी परेरा ☆ प्रस्तुति – सुश्री दीप्ती गौतम ☆

मी कधी कधी अंधाऱ्या रात्री

माझ्या अंतरात्म्याच्या नाकासमोर सूत धरतो

आणि खात्री करतो त्याचा श्वासोच्छवास सुरु असल्याची

कारण मला शंका आहे की . .

तो रोज थोडाथोडा मरू लागलाय

 

तारांकित हॉटेलात मी जेवणाचं बिल भरतो

मला दिसतो जवळच उभा असलेला द्वारपाल

त्याचा महिन्याचा पगार या बिलाइतका तरी असेल काय?

कॉलरवर बसलेल्या नाकतोड्यासारखा,

हा विचार मी बोटाच्या टिचकीने झटकतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

मी रस्त्याकडेच्या भाजीवालीकडून भाजी घेतो

तिचा मुलगा छोटू, कांदे निवडून देतो

छोटू शाळेत का जात नसेल?

फुकट घेतलेल्या कढीपत्त्या बरोबर

हा प्रश्नही मी पिशवीतल्या भाजीखाली कोंबतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

डिझायनर कपडे चढवून मी गाडीतून जात असतो

बसल्या बसल्या गुटखा खात असतो

सिग्नलवर मळक्या, फाटक्या वस्त्रातली भिकारीण दिसते

थुकण्यासाठी खाली केलेल्या काचेतून ती हात पुढे करते

खिशात चिल्लर न सापडल्याने मी गाडीची काच वर करतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

मी मुलींसाठी महागडी खेळणी घेऊन येत असतो

खपाटीला गेलेल्या पोटाचा अन मलूल चेहऱ्याचा

एक पोरगा रस्त्यात खेळणी विकताना दिसतो

सद्सदविवेकाच्या टोचणीपायी

एक खेळणे त्याच्याकडूनही घेतले जाते, तरीही ..

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

मोलकरणीच्या ऐवजी एक दिवस तिची शाळकरी मुलगी येते

माझ्या घरच्या कामासाठी तिने शाळा बुडविलेली असते

तिला शाळेत पाठवावं असं क्षणभर माझ्या मनात येते

मग मला उष्ट्या भांड्यांनी भरलेलं सिंक दिसतं

एकदोन दिवसाचा तर मामला आहे, मी मलाच समजावतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

रोज सकाळी एखादी ब्रेकिंग न्यूज येते

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची किंवा हत्येची

वाईट वाटते खूप, तरीही मी देवाचे आभार मानतो

कि ती अभागी अत्याचारग्रस्त,

माझी मुलगी नाहीये

आरशामध्ये स्वतःच्या नजरेला नजर द्यायलाही मी घाबरतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

जातीपातीवरून, आरक्षणावरून होणारे झगडे रोजचेच

अधूनमधून होणाऱ्या दंगलींनी मी अस्वस्थ होतो

कुठे नेऊन ठेवलाय देश माझा?

मी उद्वेगाने म्हणतो

सर्व दोष राजकारण्यांवर टाकून, हात झटकून मी मोकळा होतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

प्रदूषित हवा शहराचा गळा घोटत असताना

विकासाचा भार शहराला सोसत नसताना

मी रोज कार घेऊन ऑफिसला जातो

बस, ट्रेन, मेट्रो, कारपूल हे पर्याय असतीलही कदाचित,

एका कारने काय फरक पडतो असा विचार मी करतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

किट्ट काळोख्या रात्री जेव्हा मी

माझ्या अंतरात्म्याच्या नाकासमोर सूत धरतो

त्याचा श्वासोच्छवास सुरु पाहून मलाच आश्चर्य वाटतं

 

मग मी नव्याने, स्वतःच्या हाताने, नवनव्या मार्गाने

त्याला रोज थोडंथोडं मारू लागतो, पुरु लागतो

मूळ इंग्रजी कविता : It dies a little.

कवयित्री : सुश्री रश्मी  त्रिवेदी

मुक्तानुवाद :श्री सॅबी परेरा

संग्राहिका : सुश्री दीप्ती गौतम

 

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments