सौ.शशी.नाडकर्णी-नाईक
वाचताना वेचलेले
कलियुगातील राम सीता… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी
आज करंजाड येथून जात असताना रस्त्याच्या कडेनं एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं. माझी नेहमीची सवय असल्यामुळं, मी त्या भिकार्यासारख्या दिसणाऱ्या जोडप्याला, दुपार असल्यामुळं सहजच जेवणाचं विचारलं, तर ते ‘नको’ म्हणाले. मग मी त्यांना 100 रुपये देऊ केले, तर ते सुद्धा ‘नको’ म्हणाले. मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का हिंडताय ? मग उलगडत गेला त्यांचा जीवनपट :
ते 6000 कि.मी.चा प्रवास करून आता द्वारकेला स्वतःच्या घरी चालले होते. त्यांनी सांगितले, ” माझे दोन्ही डोळे 1 वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही ; मग माझ्या आईने डॉक्टरला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडलं व तिने द्वारकेच्या श्रीकृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की, डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूरला जाऊन परत द्वारकेला पायी येईल. म्हणून मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय.” मग मी त्यांच्या बायको विषयी विचारलं तर ” ती पण मला एकटं सोडायला तयार नव्हती ; रस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करुन द्यायला येते म्हणून निघाली “.
मग मी ते 25%हिन्दी, 75%इंग्रजी बोलत असल्यामुळे शिक्षणाबद्दल विचारलं तर ऐकून माझी बुद्धी सुन्न झाली. त्यांनी लंडन येथे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 7 वर्षे खगोलशास्त्र यावर पी एच डी केलीय, तर त्यांच्या बायकोने मनोविकार शास्त्र या विषयावर लंडन येथेच पी एच डी केलीय. एवढं शिकून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता. नाहीतर आपल्याकडे 10वी नापासवाला छाती ताणून हिंडतो. एवढंच नाहीतर सी. रंगराजन (रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर) यांच्याबरोबर ,तसेच अंतराळवीर कल्पना चावला ह्यांच्याबरोबर काम व मैत्रीचे संबंध होते. तसेच त्यांना मिळणारे मासिक पेन्शन ते एका अंधांच्या ट्रस्टला देऊन टाकतात.त्यांना दोन मुलगे व एक मुलगी असून ते लंडन येथे उच्च पदावर कार्यरत आहेत.
दोघे पती पत्नी आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटी व डाॅनबाॅस्कोचे गोल्ड मेडॅलिस्ट आहेत.असे असूनही ते गुजरात येथील द्वारका येथे कुठलीही फी न घेता गरजू विद्यार्थ्यांसाठी केमिस्टी आणि मॅथेमॅटीक्सचे क्लास घेतात.. सध्या ते सोशल मिडियापासून लांब राहतात. रोडच्या कडेनं जाणारं प्रत्येक जोडपं भिकारी असतंच असं काही नाही. एखादी व्यक्ती आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू राम व्हायला तयार होते आणि आपल्या पतीसोबत कोणी पत्नी सीता सुद्धा होते; म्हणूनच भेटलेली अशी माणसे आपण कलीयुगातील राम-सीताच समजायला पाहिजेत.
आम्ही जवळ जवळ 1 तास त्यांच्याशी गप्पा मारल्या. रस्त्यावर उभे राहूनच. त्यांचे प्रगल्भ विचार ऐकून मन सुन्न झाले. अहंकार गळून गेला आणि वाटलं, की आपण उगाचच खोट्या फुशारकीवर जगतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असं वाटलं की आपण या जगात शून्य आहोत. हा पायी प्रवास बघून थक्क झालो. प्रवासाला निघून तीन महिने झाले आणि अजून घरी पोचायला एक महिना लागेल.
त्यांचं नांव : डाॅ. देव उपाध्याय व डाॅ.सरोज उपाध्याय.
लेखका : अज्ञात
संग्राहिका : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक
फोन नं. 8425933533
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈