श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ ‘गोष्ट खूप छोटी असते….’ – अज्ञात ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
* तुम्ही गाडीतून जाताना, न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला, तर बऱ्याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर, “दादा, पत्ता सांगता का?” असं विचारलं, तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
*स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही, तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला, तर नातं नक्कीच जुळतं…
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
*अंधारात तुम्ही कधी पाय अडखळून पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
*आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात. पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
*घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्ह्ज द्यायचे. कधी स्किनचं मलम देऊन टाकायचं…
गोष्ट खूप छोटी असते हो,पण करायची.
*कमी जागेत बाईक पार्क करताना तिरक्या स्टॅंडवर न लावता, सरळ स्टॅंडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली, तर त्याचं “थँक यू” ऐकायला मस्त वाटतं….
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
*किराणा दुकानाच्या गर्दीत, तिने घेतलेल्या सामानाचा ढीग पाहणाऱ्याने त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली, तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.
माणसा-माणसांतील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात…
गोष्ट खूप छोटी असते हो, पण करायची.
– अज्ञात
संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नमस्कार ताई.
खूप छान सूत्र दिलेत. कमीत कमी मी तर यांचा प्रयोग करीन, प्रथम म्हणजे घंटागाडी वाला उपाय आणि इतर सुध्दा.अभिनंदन.