सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ अमिताभ…स्वामी संजयानंद ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

११ ऑक्टोबरला अमिताभ ८० वर्षांचा झाला . म्हणजे साधारण माझ्या वडिलांच्या वयाचा अमिताभ. तरी त्याला ‘अहो-जाहो’ करणं अशक्य आहे. जग एवढं बदललं. नेहरू गेले. मोदी आले. साधी थिएटर गेली. मल्टिप्लेक्स आली. आता तर सिनेमा मोबाइलवर आला. टांगेवाला मर्द गेला आणि ओलासह उबेरही आली. कारखाना मालक आणि कामगार यांच्यातल्या ‘नमक’चा संदर्भ बदलला. तरीही अमिताभ नावाचा ‘सिलसिला’ सुरूच आहे. या चमत्कारानं आपलंच डोकं जड होतं. तरी, नवरत्न तेलानं मसाज करायला हा आहेच हजर!

आज ऐंशीव्या वर्षीही अमिताभ पहाटे पाचला उठून सकाळी आठला सेटवर हजर असतो. आजही दिग्दर्शकांच्या सूचनांबरहुकूम काम करत असतो. अमिताभचे समकालीन काळाच्या पडद्याआड गेले. जे आहेत, ते उपकारापुरते उरले. पण अमिताभ आहेच. कोण्या पन्नाशीतल्या बाल्कीला अमिताभसाठीच ‘चिनीकम’ करावा वाटतो वा ‘पा’मध्ये अमिताभला लहान मूल करावे वाटते. ‘मी भूमिकेसाठी अमिताभची निवड नाही केली, तर अमिताभसाठी भूमिका निवडली’, असं बाल्की सांगतो. चाळीशीतल्या नागराज मंजुळेला, ऐंशी वर्षांच्या अमिताभनं आपल्या सिनेमात काम नाही केलं, तर आपल्याला ‘मोक्ष’ मिळणार नाही, असं वाटतं. शूजित सरकारलाही अमिताभ हवा असतो आणि करण जोहरलाही.

काय आहे हे?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अमिताभ संपला नाही. कारण, तो थांबला नाही. तो साचला नाही. “आमच्यावेळी असं होतं!”, असं, माणसं दिवसातला निम्मा वेळ म्हणू लागली, की ती संपतात. आपली मुलं-बाळं रांकेला लागली की आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असं जे मानतात, ते अकाली म्हातारे होतात! सकाळी वॉक, दुपारी एक पोळी, रात्री ग्लासभर दूध एवढंच ज्यांचं आयुष्य होतं, ते त्या शेड्यूलचे गुलाम होतात. तेही ८० वर्षे फीट जगतात, पण केव्हाच संपून गेलेले असतात.

अमिताभ संपला नाही. कारण, त्याच्या त्या ‘ॲंग्री यंग मॅन’ रूपाप्रमाणेच तो सदैव कार्यरत राहिला. अपघात, आजारपणं, दुखणी त्याच्यामागे कमी नाहीत. कौटुंबिक ताण, पोराबाळांची चिंता नाही, असं नाही. उद्योगधंद्याचं तर पार दिवाळं निघालं. राजकारणात अपयशी ठरला. तरी तो उभा राहिला. धावत राहिला. अमिताभ हा अभिनेता वा माणूस म्हणून थोर आहे, असे माझे मत अजिबात नाही. पण, हे जे आहे ते का आहे? काय आहे? ते नाकारून कसे चालेल? अमिताभचा जादुई आवाज, अमिताभचा करिष्मा, कवीचा मुलगा असलेल्या अमिताभची साहित्याची समज, त्याचा आवाका, त्याची खोली हे कसं नाकारणार? रूढ अर्थानं अमिताभकडे ना चेहरा, ना ॲक्शन हीरोची शरीरसंपदा. पण, अमिताभ हा अमिताभच असतो. त्याचे डोळे, त्याचे नाक, त्याचा चेहरा, त्याची उंची, त्याचे शरीर असं सुटं सुटं करून चालत नाही. या सगळ्याचा म्हणून जो एकत्रित परिणाम आहे, तो अभूतपूर्व आहे. तो अमिताभ आहे!

परवा लॉ कॉलेज aरस्त्यावरच्या बरिस्तात कॉफी पित होतो. पलीकडच्या टेबलवर एक वयोवृद्ध जोडपं बसलं होतं. तर, दुस-या टेबलवर काही तरूण मुलं-मुली बसली होती. म्हातारा-म्हातारी पेन्शनपासून टेन्शन आणि मुलीच्या लग्नापासून ते फॉरेन टूरपर्यंत बरंच बोलत होते. तिकडं पोरं एक्झामपासून ते आयपीएलपर्यंत ब-याच गप्पा ठोकत होते. दोन्ही टेबलवरून दोन नावं मात्र सारखी ऐकू येत होती – अमिताभ बच्चन आणि शरद पवार. हे म्हातारे कॉलेजात होते, तेव्हा शरद पवार आमदार झाले, तर अमिताभच्या ‘आनंद’नं लक्ष वेधून घेतलं. किती उन्हाळे-पावसाळे पाहिले, पण हे दोघं आहेतच. पवारांचा पक्ष हरेल. अमिताभचा सिनेमा पडेल. पण, ते आहेत.

“सध्या काय करताय?” असं विचारल्यावर पवार परवा एका मुलाखतीत म्हणाले होते- “सेल्फी काढायला शिकतोय!”

हेच ते कारण आहे, ज्यामुळे माणसं ऐंशीव्या वर्षीही कार्यमग्न असतात. बाकी, तुम्हालाही नसतील, अशा व्याधी, अशी आजारपणं, अशा समस्या, असे ताण, असे प्रश्न त्यांच्या वाट्याला आहेत. पण, ‘ॲंग्री यंग मॅन’ला डोक्यावर घेणा-यांची नातवंडं कॉलेजात जाऊ लागली, तरीही हा ‘यंग मॅन’ अमिताभ आहेच. आणि, पवार ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तेव्हा पवारांविषयी बोलणा-यांना आज त्यांची नातवंडं शरद पवारांविषयी सांगू लागली आहेत!

हे दोन्ही ‘बच्चन’ आजही कार्यरत आहेत, पण ते दोघेच नाहीत. तिकडे ८५ व्या वर्षी आमचे भालचंद्र नेमाडे नव्या प्रकल्पावर अहोरात्र काम करताहेत. त्यांच्या लिहिण्याने नव्या मुलांना आजही झपाटून टाकताहेत. त्याच वयाचे रतन टाटाही पहाटे पाचला उठून दिवस सुरू करताहेत.

शुभ्रा गुप्ता म्हणते ते खरंय. अमिताभच्या घरावर एकच पाटी आहे –

“Work in Progress!”

अमिताभला ‘हॅपी बड्डे’ म्हणणं म्हणजे अखंड, अविरत, अव्याहत अशा कार्यमग्नतेचं सेलेब्रेशन आहे! अमिताभ एका रात्रीत जन्माला येत नाही. तो अव्याहत कामातून, कार्यमग्नतेतून, अविचल निष्ठेतून ‘अमिताभ’ होत असतो.

हे ‘अमिताभ’पण लक्षात घ्यायला हवं.

(फक्त माहिती म्हणून सांगतो – अमिताभ हे महायान पंथातल्या बुद्धांचे एक नाव आहे.)

अविरत चालणं हा अमिताभचा ‘पासवर्ड’ आहे’. सो, चालत राहा. मुक्काम आणि मोक्षाच्या आशा करू नका.

पडद्यावर धावणारा अमिताभ आठवा आणि तसेच पॅशनेटली धावत राहा. चालत राहा. अविरत कार्यरत राहा.

तुम्हीही बच्चन व्हाल! माझी गॅरंटी.

लेखक – स्वामी संजयानंद

संग्राहिका -सौ. शशी नाडकर्णी- नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments