सुश्री मंजुषा सुनीत मुळे
वाचताना वेचलेले
☆ असं कुठं असतं का देवा? ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆
चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर
जन्म दिलास माणसाचा
हाच एक जन्म जिथून
मार्ग खुला मोक्षाचा
दिलंस एक मन त्यात
अनेक विचारांचा वावर
आणि म्हणतोस आता
या विचारांना आवर
दिलेस दोन डोळे
सौंदर्य सृष्टीचे बघायला
आता म्हणतोस मिटून घे
आणि बघ तुझ्यातल्या स्वतःला
नानाविध चवी घेण्यास
दिलीस एक रसना
आणि आता म्हणतोस
अन्नावर ठेवू नकोस वासना
जन्मापासून नात्यांच्या
बंधनात अडकवतोस
बंध सगळे खोटे असतात
असं आता म्हणतोस
भाव आणि भावनांचा
इतका वाढवतोस गुंता
आणि मग सांगतोस
व्यर्थ आहे ही चिंता
संसाराच्या रगाड्यात
पुरता अडकवून टाकतोस
म्हणे शांतपणे ध्यान कर आता
अशी कशी रे मजा करतोस??
मेजवानीने भरलेले ताट
समोर बघून उपास करायचा
हाच अर्थ का रे
सांग बरं मोक्षाचा?
वर बसून छान पैकी
आमची बघ हो तू मजा
पाप आणि पुण्याची
मांड बेरीज आणि वजा
माहीत नाही बाबा मला
मिळेल की नाही मोक्ष
तू जवळ असल्याची फक्त
पटवून देत जा साक्ष ……
संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈