वाचताना वेचलेले
☆ हीच शुभेच्छा… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
बाहेर दिवाळीची धामधूम सुरु असताना वेटिंग रूम मध्ये बसून ICU मध्ये ऍडमिट असलेल्या नातेवाईकांच्या टेन्शनमध्ये जे कोणी बसलेत, त्यांचा नातेवाईक लवकर पूर्ण बरा होऊन घरी सुखरूप यावा ही शुभेच्छा….!
फटाक्यांच्या दुकानातली गर्दी पाहूनही जे बालगोपाळ आपल्या बाबांच्या बजेटमुळे मनसोक्त खरेदी करू शकत नाहीत त्यांना भरपूर फटाके खरेदी करता यावेत ही शुभेच्छा…..!
शेजारणीच्या घरचा भरगच्च दिवाळी फराळ नुसता पाहून घरी परत आलेल्या गरीब गृहिणीला मनासारख्या लाडू, करंज्या, चिवडा करून आपल्या कुटुंबाला तृप्त करता यावं ही शुभेच्छा…..!
काचेमागच्या मिठाईला नुसता डोळ्यांनी स्पर्श करून सुखवणाऱ्या गरीब डोळ्यांना आता चवीचं सुखही जिभेला मिळावं ही शुभेच्छा…..!
बायकोला एखादा सोन्याचा दागिना करावा ही अनेकांची अनेक वर्षाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण व्हावी ही शुभेच्छा…..!
गेली दोन वर्ष एकही नवा ड्रेस न शिवलेल्यांना यंदा मनासारखा ड्रेस शिवता यावा ही शुभेच्छा…..!
आपल्या खिशाला कात्री लावून आपल्या कुटुंबाची आनंदाची दिवाळी साजरी व्हावी यासाठी स्वतःकरता काही न घेता मन मारुन दिवाळी साजरी करतात अशा वडलांना मन न मारून दिवाळी साजरी करता यावी त्याबद्दल शुभेच्छा..!
सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ दे आई जगदंबे—- हीच इच्छा…
संग्राहक – श्री अनंत केळकर