सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ तो कल्याण करी — तो मुरारी वनचरी — तो रामकृष्णहरी… सौ.प्रिया श्रीनिवास जोग ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
आज गर्भरेशमी लाल रंगाचा शालू सीतामाईंच्या अंगावर अगदी खुलून दिसत होता. साक्षात लक्ष्मीचे तेज, तिचे ऐश्वर्य त्यांच्या मुखावर विलसत होते. पण कधी आपल्या रुपाचा त्यांना गर्व नाही झाला. अत्यंत सालस अन् सोज्ज्वळ अशी ती सीतामाई ! दाशरथी रामाची जनकनंदिनी सीता !
खरंतर देवळात आवळी पूजनाची चाललेली तयारी पाहून सीतामाई खुलल्या होत्या. वनवासातले भोग भोगून त्या मानवी जीवन खूप जवळून समजल्या होत्या. म्हणून तर माणसांच्यात घटकाभर त्यांनाही रमायला आवडत असावे. तितक्यात कुणीतरी एका कुंडीत लावलेले आवळीचे झाड तिथे आणून ठेवले. पाठोपाठ भगवान विष्णूंचा ध्यानस्थ फोटोही तिथे मांडण्यात आला. कुंडीभोवती फुलांची रांगोळी काय, फुलांचे तुळशीचे हार काय !! ती कुंडीतली छोटीशी आमलकी अर्थात आवळीच हो, लाजून चूर होतेय असा सीतामाईंना भास झाला. तिची इवली इवलाली नाजूक पाने तिने जणू लाजबावरी होऊन मिटून घेतली होती असंच वाटत होतं. खरंतर किती साधंसच तिचं रुप, पण श्रीविष्णूंच्या सान्निध्यात ते अधिकच खुललं होतं. ती अधिकच सौंदर्यवती भासत होती. नववधूचे भाव तिच्यावर विलसत होते. खरंतर नववधू तर सध्या वृंदादेवी आहेत. पण तरीही ही आमलकी किती आनंदात दिसत होती. औटघटकेचे तिचे हे सुख, हे सान्निध्य, पण ती अत्यंत समाधानी होती. सीतामाई एकटक तिच्याकडे पहात होत्या. ते रामरायांच्या चतुर नजरेने बरोबर टिपलं. थोडीशी थट्टा करायची लहर त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी एकवार लक्ष्मणाकडेही पाहिलं. पण तो काय बोलणार अशावेळी. तो बिचारा आपले धनुष्य सावरीत स्वस्थ उभा !!
श्रीराम — सीते, हे सीते , अशा एकटक कुठे पाहताय नक्की ? तुमच्याहून रुपाने कुणी सरस आहे की काय ?
सीतामाई – लटके हसत मान वेळावत, “अहो तसंच काही नाही. पण आज ती आमलकी पहा ना कशी अनुपम दिसतेय. आजचा दिवस तिच्या भाग्याचा. हेवा नाही हो आमच्या मनी. आपले एकपत्नी व्रत आम्ही जाणत नाही का ? पण तिचे उजळलेले रुप नेत्रात साठवावे वाटते हो. आज तिला विष्णूंचे सान्निध्य लाभलंय. त्यांचा परीस स्पर्श तिला मिळतोय. त्यांची कृपादृष्टी आज तिच्यावर आहे. समाधान मिळतंय हो ते पाहून.
श्रीराम— सीते हे वैभव तर तिच्या ओटीत तुम्हीच घातलंत ना. तिच्या झाडाखाली विष्णूरुपात पूजा करुन–तेही तुमच्या लक्ष्मीरुपात. आपण उभयतांनी तिथेच वास केला म्हणून तर तिचे माहात्म्य थोर झाले.
सीतामाई— ते सारं स्मरणात आहे हो. पण मी आता वेगळाच विचार करतेय. आपण राम अवतारात १४ वर्षे वनांतरी काढली. आणि त्या गोकुळातल्या कृष्णाने गाईगुरांबरोबर गोपगोपींबरोबर वनविहार केला. दोन्ही अवतारात वनात वास होताच. पण किती फरक पडला ना दोहोंत. कृष्ण अवतारात आपला एकमेकांचा सहवास किती ते जरा आठवावंच लागेल. तुमचा सहवास लाभला तो राधेला आणि वृंदेलाच.
श्रीराम — अवतारलीला होत्या त्या सर्व. पण हा राम मात्र सीतारामच किंवा सीताकांत म्हणून स्मरला जातो हेही सत्य आहे ना–
“ सीताकांत स्मरण जयजयराम “ — लक्ष्मणाने हळूच जयजयकार करत श्रीरामांना आपले अनुमोदन दर्शवले.
आता यावर सीतामाई निरुत्तर. पण रामांना कोपरखळी मारायचीच होती. त्यांचे लक्ष तितक्यात समोर गेलं. लाडू, पेढे, पोहे, चित्रान्ना, केळी, फुटाणे,- भगवंतासमोर किती ते भोग मांडले जात होते. पाणी फिरवून नैवेद्य दाखवला जात होता. रामराया आशिर्वाद मुद्रेत होते. स्मित हास्य चेहेऱ्यावर उमटत होते. ते पाहून सीतामाई चटकन म्हणाल्या,
“ अहो ऐकलंत का, तो नैवेद्य कृष्णार्पण आहे बरं. रामराय काय वनवासी, कंदमुळं खाऊन राहिलेले. तुम्हाला कुठला नैवेद्य दाखवायचा हा भक्तांना कायम प्रश्न पडत असावा. त्यामुळे सगळा नैवेद्य कृष्णार्पणच !! आणि हो, इथे श्रीविष्णूसहस्रनाम आवर्तन होणार आहे हे पण ध्यानात असू दे. “
श्रीराम — “ होय सीते जाणून आहोत ते आम्ही. ‘ सहस्र नाम तत्तुल्य रामनाम वरानने ‘ – ठाऊक आहे ना.
रामकृष्णहरी हा या युगासाठी अत्यंत सोपा मंत्र आहे. जो हा मंत्र जपेल त्याचे कल्याण होईल. आवर्तन श्रीविष्णूसहस्रनामाचे पण साक्षीला राम आहे हे महत्त्वाचे !!”
सीतामाई — एकवचनी रामाचे कुठलेही वचन कसे हो उणे पडावे. आम्ही निरुत्तर आहोत. तुमच्या बाणांप्रमाणे तुमचे वाक्बाणही अमोघ आहेत हे मान्य आहे आम्हाला.”
श्रीराम -राम अवतारात वनवासी राहिलो. पण कृष्ण अवतारात खरे निसर्ग सान्निध्य मोकळेपणाने अनुभवले. गोपांचा जीवनाधार तो गोवर्धन, त्यावरील वृक्ष राजी, यमुनेचा तो खळाळ अन् तिचे ते धीरगंभीर डोह, यमुना तटावरचा तो कदंब, आवळी, ते वृंदावन, गोधन, वेणूनादाने नादावलेले इतरही पशुपक्षी, हे सारे तर सृष्टीचे भाग. ही विपुल सृष्टी आहे. म्हणून मानवी जीवन समृद्ध आहे. म्हणूनच फक्त गोवर्धन नव्हे तर सर्व सृष्टीचे वर्धन व्हावे आणि अर्थातच पुढील पिढीसाठी संवर्धनही तितकेच महत्वाचे हे जाणून तशा लिला रचल्या. तशा कथा रचल्या आणि त्यातून कालातीत असे संदेश मानव जातीला दिले.”
सीतामाई — होय त्यासाठी गीतेची निर्मिती झाली. विभूतीयोगाद्वारे आपली विभूती निसर्गाच्या कोणकोणत्या रुपात आहे हे सांगितलंत. तेच मुख्य सूत्र धरुन आपल्या ऋषीमुनींनी सणवारांची रचना केली, असंच म्हणायचं आहे ना ?”
लक्ष्मण — “ मध्येच बोलतोय श्रीरामा. शेषरुपात या पृथ्वीचा भार आम्ही तोलतोय म्हणून जे वाटतंय ते बोलू का–”
सीतामाई — “ अहो भाऊजी, परवानगी काय हो मागताय? अहो बोलू शकता तुम्ही. तुमचे आमच्यात शाश्वत स्थान आहेच.”
लक्ष्मण — “ मानवाने त्याच्या कल्याणाकरता घालून दिलेल्या परंपरांचे पालन करावे यासाठी खरेतर मीच मनोभावे प्रार्थना करेन. कारण मानवाची चुकीची पावले धरणीला भारभूत होतात. आणि पर्यायाने मलाही.”
श्रीराम– “ अगदी योग्य बोललास लक्ष्मणा ! धर्माचे पालन व रक्षण करण्यासाठी परंपरांचे आणि पर्यावरणाचेही समजून उमजून जतन हेही महत्त्वाचे. काळाची बदलती पावले ओळखण्याइतका माणूस सूज्ञ आहेच. त्याने फक्त हितकारी मार्गावर पावले टाकत समस्त मानव जातीचे कल्याण साधावे.”
रामराया कल्याण करायला उत्सुक आहेतच. ते सर्वांच्या हृदयातच स्थित आहेत. ते फक्त ओळखावे आणि ज्याने त्याने आपले कल्याण साधावे.
लेखिका : सौ.प्रिया श्रीनिवास जोग, चिंचवड पुणे
संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈