श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
वाचताना वेचलेले
☆ !! पन्नाशी पार करतांना !! … लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆
एकदा एका पन्नाशी ओलांडलेल्या आणि साठीच्या वाटेवर असणाऱ्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले,
” मित्रा, पन्नाशी ओलांडल्यावर आणि साठीकडे जाताना तुझ्यात काय बदललंय असं तुला वाटतंय? ”
— यावर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतलं तर प्रत्येकासाठी आपले आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित ! त्याने जे उत्तर दिले ते असे………
— आजवर मी माझ्या आईवडिलांवर, भावंडांवर, मुलांवर, बायकोवर, सहकाऱ्यांवर, शेजाऱ्यापाजाऱ्यांवर, मित्रांवर खूप प्रेम केले, त्यांची खूप काळजी घेतली. पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलोय, आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केलीय
— मला याची जाणीव झालीय की, आता मी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही, की कुणीही यावं आणि त्यांनी आपले ओझे माझ्या खांद्यावर टाकावे.
— आता मी भाजीवाल्याशी, फळविक्रेत्याशी, फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय. उलट आता मला असं वाटतं की माझ्या काही पैश्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरीबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना !
— आता मी माझ्या जीवनसंघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्याचं आणि सल्ले देण्याचं बंद केलंय. कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित कालबाह्य झाल्या आहेत. माझ्या त्या संदर्भांचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही.
— आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याच्या किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला कळून चुकलंय. आता मला इतरांच्या परफेक्शनपेक्षा माझी शांतता अधिक महत्वाची वाटते.
— आता मी समोरच्याच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलोय. त्याने समोरच्याला बरे वाटते, तो सुखावून जातो.
— आता माझ्या अंगावरच्या कपड्यांची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही. जे लोक मला अंतर्बाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाही हे मला कळून चुकलंय.
— ज्यांना माझी किंमत नाही अशांकडे मी आता दुर्लक्ष करतो. कारण त्यांना माहिती नसली तरी मला माझी किंमत चांगली माहिती आहे.
— आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही.
— आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही. भावना असणं हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आता हसावंसं वाटलं की हसून घ्यायचं आणि रडावंसं वाटलं की रडून घ्यायचं. भावना लपवण्याच्या नादात उगाच घुसमटत रहायचं नाही.
— आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो. प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायला लागला तरी मी एकवेळ तडजोड करतो, पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून ! कारण नाते टिकवण्याची जबाबदारी कुणा एकाची असूच शकत नाही.
— आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगण्याचा प्रयत्न करतो. मला जे करावसं वाटत ते मी करतो. फक्त एवढंच की, माझ्या स्वछंदी जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मी काळजी घेतो.
— मला माहित आहे की, जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चात्ताप करत बसत, ना भविष्यकाळात जाऊन चिंता करत बसत… आता निख्खळ आणि निख्खळ जीवनाचा आनंद घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका द्यायचा…!!
— आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे.
— आता लक्षात आले आहे की, संकटात असलेल्या व्यक्तीला मदत नाही केली तर तो तक्रार न करता देवासमोर जाऊन रडतो. त्याच्या तळमळलेल्या आत्म्याचा आवाज कानात ऐकू येत असल्याची भावनाही मनात येते.
खरंच, वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना?
— आत्ता कळले जीवन सुंदर आहे. पण ते सरळमार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे.
खूप खूप शुभेच्छा पन्नाशी ओलांडताना !! —
लेखक : अज्ञात
संग्राहक : श्यामसुंदर धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈