सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 39 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
६५.
माझ्या आयुष्याच्या भरून वाहणाऱ्या
या कपातून माझ्या देवा,
कोणते दैवी पेय तुला देऊ?
” हे माझ्या कवि! माझ्या नजरेतून तुझी निर्मिती
मी पहावी यात तुला आनंद आहे का?
माझ्या कानांच्या दारात शांतपणं उभं राहून
तुझीच चिरंतन संगीत रचना
ऐकायची आहे का?”
माझ्या मनात तुझे विश्व शब्दजुळणी करते आहे.
तुझा आनंद त्यात संगीत भरतो आहे.
प्रेमानं तू मला तुझं सारं देतोस
आणि तुझा सारा गोडवा त्यात भरतोस.
६६.
माझ्या देवा!
संध्यासमयीच्या अंधूक प्रकाशात
माझ्या खोल अंतर्यामी जी भरून राहिली आहे,
सकाळच्या उजेडात जिनं आपला पडदा बाजूस
सारला नाही तीच माझ्या अखेरच्या गीतात
दडलेली माझी भेट असेल.
शब्द काकुळती आले,पण व्यर्थ!
तिला वश करू शकले नाहीत.
त्यांनी उत्सुकतेने आपले हात पुढे केले.
माझ्या ऱ्हदयाच्या गाभाऱ्यात
तिला बसवून मी देशोदेशी भटकलो.
माझ्या आयुष्याचे चढ-उतार
तिच्याभोवती वर खाली झाले.
माझे विचार, माझ्या कृती,
माझी निद्रा, माझी स्वप्नं यावर तिचंच
अधिराज्य होतं, तरी ती परस्थच राहिली.
किती माणसं आली, माझं दार खटखटून गेली
आणि निराश झाली.
तिला समोरासमोर कुणी कधीच पाहिलं नाही.
तू तिला ओळखावसं अशी वाट पहात
ती स्वतःच्या एकटेपणात तशीच राहिली.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈