वाचताना वेचलेले
☆ “फक्त एक फोन कॉल…” ☆ सुश्री हेमा फाटक ☆
पंचाऐंशी वर्षाच्या आईला पन्नाशी पार लेक फोन करते. खरंतर भरपूर वाचन वगैरे करणारी आई, तरीही वय बोलायचं ते बोलणारच. फोन केला आणि काय म्हणतेस विचारलं, तर आई फक्त “चाललंय चाललंय” असं उदास स्वरात म्हणत राहते. क्वचित काही तब्येतीचं छोटंमोठं.
कधीतरी अचानक फोन करत लेक विचारते, “अगं कोकणात केळीच्या पानावर दशम्या करायचे बघ किंवा मेथांबा केला पण तुझ्यासारखा नाही झाला….. त्याची रेसिपी सांग ना जरा , आज फार आठवण आली त्या चुलीची आणि चुलीवरच्या दशम्यांची , ‘ तुझ्यावाल्या ‘ मेथांब्याची.” इथे ‘ तुझावाला ‘ या शब्दाला वेगळंच वजन मिळतं.
वास्तविक लेकीचा मेथांबा अप्रतिम झालेला असतो.
तर…. तिकडे आईच्या डोळ्यात आलेली चमक इकडे लेकीला आतून जाणवते. दिसत नसतं तरी लेकीला जाणवतं आई उदासपणा टाकत सरसावून बसलेली…..
आई तिच्या सवयीप्रमाणे अगदी बेसिक पासून सुरु करते— ” तांदूळ धुवून स्वच्छ फडक्यावर, घरातल्या घरात सावलीत वाळवायचे ……. ”
” तुला सांगते ….अमूक स्वच्छ, तमुक एकसारखं, ढमूक कडकडीत वाळवून…! !”
— रेसिपी चालूच राहते. ठाऊक असलेल्या गोष्टी, लेक हं हंss , अच्छा अच्छा म्हणत ऐकत राहते. ओठांवर मंद हसू खेळत राहतं. मेथांब्याच्या भांड्याकडे बोट दाखवत नवरा खूणेनं विचारतो, ” मेथांबा झालाय ना, मग हा फोन कशाला?” ती त्याला खूणेनं गप्प करते. फोन चालू असतो.
चुलाण्याचा सुगंध आणि दशम्यांची चव , मेथांब्याचा जमून आलेला पिवळट काळसर केशरी रंग तन मन भरून व्यापून राहतात.
लेकीला स्वतःच्या घरात पडलेली पन्नास कामं दिसत असतात, पण हे एक्कावनावं त्याहून फार मोठं, मोलाचं.
— आई बोलते …. आई बोलत राहते.
— लेक शांत झालेली असते.
लेक आईची आई होऊन जाते. फार मोठ्ठं चमकदार काहीच घडलेलं नसतं.. फक्त एक फोनकॉलच तर असतो.
छोट्या गोष्टीही अशा आभाळ भरून टाकतात —–
संग्रहिका : सुश्री हेमा फाटक
भाषाशैली गावबोली आहे.. कोणत्या गावाकडील आहे