सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ फुगलेलं आणि रुसलेलं दार… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

एक होती “ही” आणि एक होती “ती”.

दोघी समवयस्क आणि अनेक वर्ष शेजारी-शेजारी…. म्हणजे तशी “ही” राहायची पहिल्या मजल्यावर आणि “ती” दुसऱ्या. पण शेजारधर्म मात्र कायमच होता. कधी काही लागलं की हक्कानी सांगायच्या एकमेकांना. 

दोन्ही घरचा एक तरी डबा किंवा वाटी कायम दुसऱ्या घरी असायचीच. 

एके दिवशी “ही” च्या ह्यांना पावसामुळे किराणा आणायला जमलं नव्हतं. मग काय ?? “ही” गेली वाटी घेऊन साखर आणायला “ती” च्या कडे. “ती”नी सुद्धा “ही” चं हसत स्वागत केलं आणि दिली लगेच साखर…… 

“ही” चपला घालत थोडी आडोशाला काय गेली तशी “ती” जोरात पुटपुटली. “ रोजचाच ताप झालाय हा .. कटकट नुसती !!” … असं म्हणत वैतागून “धाडकन” दार लावलं जोरात.  “ही” ला ऐकू गेलंच .. बहुतेक ऐकू जाण्यासाठीच जोरात बोलली होती “ती”.

मग “ही” ची पण जरा सटकलीच. तणतणत वरती आपल्या घरी आली. “ एक वाटी साखर काय मागितली तर 

इतकं ?? जसं काही इस्टेट मागितली “ती” ची !!”…. असे ताशेरे झोडत “ही” नी दुप्पट जोरात आपलं दार लावलं. 

इतकंss  की खाली “ती” ला मुद्दाम ऐकू जावं. 

तेव्हापासून कानाला खडा…. “ही” आणि “ती” यांचं संभाषणच बंद. 

“ती”ला कळलंच नाही नेमकं काय झालंय. म्हणून एक-दोनदा गेली बोलायला. पण “ही” ढुंकुन सुद्धा बघायची नाही “ती”च्याकडे…… ‘ दोस्ती मे दरार… ‘

काहीच दिवसात बिल्डिंगला पालिकेकडून धोकादायकची पाटी लागली.  मग सगळेच वेगवेगळ्या दिशांना पांगले. 

दोघींचा काहीच संबंध आणि संपर्क उरला नाही. काळ लोटला .. वयं वाढली. 

जवळ एक आध्यात्मिक शिबिर होतं चार दिवसांचं. दोघींनीही तिथे नाव नोंदवलं होतं. योगायोगाने दोघींचीही राहायची व्यवस्था एकाच खोलीत. पण खूप गप्पा माराव्या असं वाटत असलं तरीही मनात दुरावा होताच अजून. 

पण “जुनं सगळं सोडून नव्याने संवाद साधा” अशी शिबिरातली शिकवण. म्हणून शेवटच्या दिवशी बोलल्या एकदाच्या…..  

“ही” ची तणतण मागील पानावरून पुढे.. 

“ काय गं ?? xxxxxxxx .. इस्टेट मागितली होती का ?”.. वगैरे वगैरे.

“ का गं ? असं का विचारतेस ??” 

“ मग रोजची कटकट म्हणत इतक्या जोरात तोंडावर दार आपटलंस ते माझ्या ? 

“ती” नी डोक्याला हात लावला.

“ बाप रे !! म्हणून बोलत नव्हतीस होय इतके वर्ष ??”  अगंss  ते मी तुला नाहीss  त्या दाराला म्हणत होते आमच्या !! आठवतंय ना,  पावसाळा होता तेव्हा ?? कसलं फुगलं होतं ते “दार”.. लावताना नाकी नऊ यायचे अगदी !! त्याला 

रोजचा ताप म्हणाले होते ss !! ”

“ अय्याss हो का?? .. हो बरोबर .. आमचं पण दार खूप फुगलं होतं तेव्हा. “ 

……. दोघींचा “रुसवा” कारण दाराचा “फुगवा” … एवढंच कारण फक्त… 

तेव्हा लक्षात ठेवा “ पावसाळ्यात दारं फुगतात ”. कुणी तुमच्या समोर असं धाडकन दार लावलं तर गैरसमज नसावा. 

बिल्डिंगमध्ये दारांचा असा जोरात आवाज येऊ शकतो…..  “ नवरा बायकोचं भांडण झालं असेल ” असे निष्कर्ष लगेच काढू नका. 

आणि हो ss  ……  

आपण सगळ्यांनीच “ मनाची दारं ” मात्र फुगण्यापासून वाचवूया…. किलकिली तरी ठेवूया निदान….. 

चांगले विचार आत यायला आणि वाईट बाहेर घालवायला. 

सरतेशेवटी सगळ्यात महत्वाचं… 

कधीही काही वाटलं तर आडपडदा न ठेवता लगेच बोलूया एकमेकांशी. बरेचदा कारण क्षुल्लक असतं पण आपण उगाच गंभीर समजतो. 

— बघितलं ना ss  “ही आणि ती”च्या चांगल्या मैत्रीची कितीतरी वर्ष वाया गेली. 

— आणि कारण काय तर “ घराचं फुगलेलं ” आणि “ मनाचं रुसलेलं ” ..  “दार”. 

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments