सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 41 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
६९.
माझ्या धमन्यांमधून जो जीवनस्त्रोत वाहतो आहे
तोच अहोरात्र या विश्वातून वाहात असून
तालबद्ध नृत्य करतो आहे.
धरतीच्या मातीतून तो जीवनस्त्रोत
आनंद निर्भरतेनं अगणित तृणपात्यातून आणि आनंदानं नाचणाऱ्या फुलांच्या लहरीतून उमटतो .
जनन- मरणाच्या, सागराच्या भरती ओहोटीतून
तोच हेलकावे खात असतो.
जीवन – विश्वाच्या स्पर्शामुळं
माझी गात्रं दिव्य झाली.
या क्षणी युगांत जीवन स्पंदन
माझ्या अभियानातून नर्तन करत आहे.
७०.
या आनंदाच्या, तालाच्या भीषण भोवऱ्यात
फेकलं जाणं,नाहीसं होणं तुला अशक्य आहे का?
साऱ्याच गोष्टी धावतात, थांबत नाहीत.
मागे वळून पाहात नाहीत,
कोणाचीच सत्ता त्यांना रोखू शकत नाही,
त्या धावतच असतात.
त्या वेगवान व अस्थिर संगीताबरोबरच
ऋतू नाचत येतात, जातात.
निरंतर वाहणाऱ्या झऱ्यातून रंग, ध्वनी आणि
सुगंध यांचा आनंद पसरतो आणि नाहिसा होतो.
७१.
मी माझा अहंकार पुरवावा, तो मिरवावा,
तुझ्या तेजावर रंगीबेरंगी छाया फेकाव्यात-
ही सारी तुझीच माया.
तू स्वतःच्या अस्तित्वावर बंधनं घालतोस आणि
अगणित स्वरात स्वतःला विभागात राहतोस.
हे तुझं स्वतःचं अलगपण शरीररूपानं माझ्यात आलंय.
सर्वत्र आकाशात हे गान भरून राहिलंय.
त्यात किती रंगाचे आसू- हसू आशा नि धोके!
लाटा उठतात आणि विरतात.
स्वप्नं उमटतात आणि शिरतात.
माझा पराजय हा तुझाच पराजय आहे.
दिवस रात्रीच्या कुंचलानं अगणित चित्रं काढून
तू हा पडदा रंगवून सोडलास.
या पडद्यामागे तुझं आसन चितारलं आहेस,
त्यात निष्फळ, सरळ रेषा न वापरता
अद्भुतरम्य गोलाकार वळणांचा वापर केलास.
तुझा आणि माझा हा खेळ
सर्व आभाळात चालला आहे.
तुझ्या – माझ्या गीतानं सारं वातावरण
दुमदुमत आहे.
तुझ्या – माझ्या पाठशिवणीच्या या खेळात
लपंडावात किती युगं गेली?
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈