सुश्री प्रभा हर्षे
वाचताना वेचलेले
☆ काय गंमत आहे बोलण्यात— ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
काय पण गंमत आहे बोलण्यात , आपण “शब्द” किती पटकन बदलतो,
कशालाही नावं देताना आपण त्यांच्या “स्थाना”वरून निश्चित ठरवतो.
नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला “खड्डा” म्हणून हिणवतो…….
तर नितळ गालावरच्या छोट्या खड्ड्याला “खळी” म्हणून खुलवतो…….
भिंतीवर पडलेल्या काळ्या ठिपक्याला “डाग” म्हणून डावलतो…….
तर चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागाला “तीळ” म्हणून गोंजारतो…….
तुटुन पडलेल्या केसांच्या पुंजीला “जटा” म्हणून हेटाळतो…….
तर चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या जोडीला “बटा” म्हणून सरकवतो…….
असंच असतं आयुष्यात आपल्याही “सोबती”नेच आपण तसे घडतो…….
चुकीच्या सोबतीने माणूस बहकतो, “योग्य” सोबतीनेच अधिक बहरतो……
एकदा प्रवीण दवणेंनी शांताबाई शेळके यांना विचारले की तुम्ही तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ असे दोन शब्द वापरले आहेत… दोन्हींचाही अर्थ पहायला गेला तर एकच आहे… मग असे दोन वेगळे शब्द का ..?
शांताबाईंनी किती सुंदर उत्तर दिले पहा.. त्या म्हणाल्या……
…चुकतोयस तू प्रवीण…
,..जे निरभ्र असते ते आकाश..
आणि ..जे भरून येते ते आभाळ..!!
…आणि म्हणूनच त्या निसर्गाच्या… त्या भगवंताच्या असीम कृपेला, त्याच्या मायेला आकाशमाया नाही तर आभाऴमाया म्हणतात ..!!
अशीच आभाळमाया तुम्हा सर्वांमध्ये राहू देत. हीच प्रार्थना
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈