वाचताना वेचलेले
☆ Priority माणसांची ☆ प्रस्तुति – सुश्री दीप्ती गौतम ☆
“मला नाही जमणार ग ह्यावेळी,”
… हे वाक्य आपण स्त्रिया किती वेळा निरनिराळ्या ठिकाणी वापरतो. काही वेळा ह्या वाक्यामागे खरं कारण असतं, तर काही वेळा ती गोष्ट टाळायची म्हणून घेतलेला हा stance असतो. असं का होतं, ह्याचा विचार केला तर लक्षात येते की आपल्या priorities ठरलेल्या असतात, त्यात जास्त फेरफार आपल्याला झेपत नाही.
माझी आई नेहेमी सांगायची की “बाकी कशाला सवड काढ, नाही तर काढू नकोस, पण आपल्या सणावारांना, देवासमोर निवांत दिवा लावण्यासाठी, मुलांच्या शाळेतील शिक्षक पालक मीटिंगला, कुटुंबीयांच्या वाढदिवसाला, स्वतःच्या तब्येतीसाठी, मैत्रिणींबरोबर मज्जा करण्यासाठी नक्की वेळ काढ.”
मला काही सगळं पटायचं नाही. मी म्हणायचे, “आई कामासाठी वेळ नको का?”
तर आई हसून सांगायची, “महिन्याचा पगार मिळेल, बढती मिळेल म्हणून तू रोजच अगदी नेटाने काम करतेस ग. पण नात्यांचे काय? आपल्या सांस्कृतिक विचारांचे काय? त्यासाठी वेळ काढावाच लागेल. नाहीतर आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा एकटी घरात असशील, तेव्हा कोण असणार आहे?”
नातेवाईकांकडे कधी गेली नाहीस, मैत्रिणींना कधी घरी बोलावले नाहीस, स्वतः गेली नाहीस, मग तुझ्या उतरत्या काळात त्या येतील, अशी अपेक्षा करु नकोस! आपण माणसे इतकी स्वार्थी असतो, की काही न देता आपल्याला समोरच्याकडून मात्र भरपूर अपेक्षा असतात आणि अपेक्षाभंग झाला तर वाईटही वाटते.”
आईला म्हटलं, “तू एवढी psychology कधी शिकलीस ग?” … ती हसली आणि म्हणाली, “आयुष्य जेवढं शिकवतं, तेवढं तुमच्या एमबीए मध्ये पण नाही शिकवत.. तेव्हा माणसांना आधी priority दे तरच आयुष्यात सुखी आणि समाधानी राहशील.”
संग्राहिका : सुश्री दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈