सौ.शशी.नाडकर्णी-नाईक
वाचताना वेचलेले
वडिलोपार्जित आई… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी
एक आई सोडली
तर
तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे
काहीही नाही आणि
भावंडांमध्येही
मी एकटाच.
एकदा
थकल्या आवाजात आई म्हणाली होती,
“तुला एखादा भाऊ हवा होता
म्हणजे जरा तुझा ताण हलका झाला असता.”
बस्स इतकेच.
मित्राकडे गेलो सहज भेटायला म्हणून
त्याची आई कुठे दिसली नाही घरात
सहज विचारले तर म्हणाला,
“दादाकडे गेली आहे पुढच्या सहा महिन्यांसाठी.”
“सहा महिन्यांसाठी म्हणजे ?
म्हणजे काय ?”
“वडील वारले आणि गावाकडच्या
घराची आणि शेतजमिनीची
वाटणी
झाली होती दोघांमध्ये
तेव्हाच ठरले होते –
आईलाही दोघांनी सहा-सहा महिने सांभाळायचे आणि
तसेच काही झाले तर अर्धा-अर्धा खर्चही
वाटून घ्यायचा दोघांनी.”
आईविना पोरक्या घराचा
आणि मित्राचा मी निरोप घेतला.
घरी आलो तर
आई अगम्य स्वरात कसली तरी पोथी बडबडत असलेली
सुरकुतलेला चेहरा, डोळे भरतीच्या समुद्रासारखे अथांग
देहाला जाणवणारा, न जाणवणारा हलकासा कंप
घट्ट पदर लपेटून, उजव्या हाताने मांडीवर हलकासा ठेका
एक अपार करूणा समोर
मूर्तिमंत !
मी जवळ गेलो तिच्या
बसलो गळून गेल्यासारखा
तर म्हणाली –
“का रे ?
चेहरा का उतरलाय ?
कोठे गेला होतास ? बरे का नाही वाटत ?”
“काही नाही गं,” असे म्हणून मी तिचा हात हातात घेतला
घट्ट धरून ठेवला
तिच्या मायेच्या स्पर्शात होता अजुनही नाळ न तुटलेला दृष्टांत.
उठलो सावकाश गेलो आत
देवघरात
मित्राची आई आठवत राहिलो
समईच्या मंद उजेडात.
रात्र झाली असावी खूप आता
मध्येच जाग येते आहे आणि
मी सावकाश येतो आईजवळ तर
ती शांत झोपलेली –
माझ्या अस्वस्थ प्रकाशाचा एक कवडसा हलतो आहे
तिच्या चेह-यावर अजुनही.
देवा,
मला कोणत्याही जन्मी
लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस
आईची वाटणी कधीही होऊ देऊ नकोस.
मी सावकाश उठतो
पाय न वाजवता
सावध फिरत राहतो सगळ्या घरभर
आईला स्मरून देवाचे आभार डोळ्यातून वाहत राहतात
माझे ओठ
रात्रभर कसलीतरी प्रार्थना गुणगुणत राहतात…
एक आई सोडली
तर
तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काहीही नाही
आणि
भावंडांमध्येही मी
एकटाच….
संग्राहिका: सौ. शशी नाडकर्णी- नाईक
फोन नं. 8425933533
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈