📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सखी — ☆ प्रस्तुती – राधा पै ☆

सखी… कोण सखी?                   

जिची साथ सुखावते…ती सखी?

आनंद साजरा करण्यासाठी पहिली हाक जिला जाते…ती सखी?

की दुखावलेल्या श्रांत मनासाठी जी शीतल श्रावणधारा होते……ती सखी?

रोज नियमाने GM-GN चे मेसेज किंवा डझनावारी emoji चा रतीब न  घालताही,  जी आपल्यासाठी सतत connected mode मध्ये असते…..ती सखी?

जिच्याशी बोलताना किती सांगू नि किती नको असं होतं…..ती सखी?

की जिला मौनाची भाषा अवगत आहे, अवाक्षरही न बोलता-जसा की शब्देविण संवादु-आपलं मन जी सहज वाचू शकते…..ती सखी?

प्रवासात असताना मधल्या स्टेशनवर चहा-नाश्ता (चहात आलं घालायला विसरु नकोस ग!…) घेऊन येण्यासाठी जिला हक्काने सांगता येतं, प्रत्येक वेळी प्लीज-थॅंक्यू म्हणण्याची कसरत न करता…..ती सखी?

जिच्या सहवासात असताना आपल्याला कोणताही मुखवटा चढविण्याचा व्यायाम करावा लागत नाही,आपण आरस्पानी, जेव्हा जसे आहोत तसे– नाठाळ, खट्याळ,आनंदी,उदास,

बिनधास्त,घाबरट,आग्रही..जी सहजतेने स्वीकारते…..ती सखी?

वाचाळ व्याख्यानी भाषा न वापरताही , आपल्या एखाद्या achievementचं कौतुक जिच्या नजरेतून ओसंडताना दिसतं…..ती सखी?

की हक्काने कान पकडून जी आपली चूक-उणीव दाखवून देत असतानाही आपला एरवी एवढ्या-तेवढ्याने फडा वर काढणारा ego आता अजिबात मान वर करीत नाही….ती सखी?

एखाद्या वैतागवाण्या गुंत्यात नाहक गुरफटायला होत असताना, जिच्या आश्वासक आधाराने आपण अलगद आपला पाय आणि श्वास मोकळा करून घेतो… त्याला तणावाचे व्यवस्थापन-भावनिक समुपदेशन अशी भारी भारी नावं (आणि भारी-भक्कम फी!) न देता….ती सखी?

जन्मजात आणि जुळलेल्या नात्यांच्या अपेक्षांचे कंगोरे जेव्हा कधी काचू लागतात, तेव्हा नात्याचे कोणतेही लेबल न लावता, जिच्या निरपेक्ष जवळीकीचे दार आपल्यासाठी नेहमीच खुलं असतं……ती सखी?

ठाशीव ठिपक्यांनी मांडलेल्या, रेखीव रेघांनी जोडलेल्या आणि सप्तरंगी छटांनी सजवलेल्या अंगणातील रांगोळीचे आमंत्रण जसे सुखद, तसेच जिचे व्यक्तिमत्त्व लोभस…..ती सखी?

होय,ही सगळी तर सखीची नानाविध विलोभनीय रूपे आहेतच,पण सखीत्व नेहमीच त्यापेक्षाही ओंजळभर अधिकच राहणार आहे ! कारण सखी म्हणजे केवळ व्यक्ती नसते,तर वृत्ती असते!!आणि ही वृत्ती सदाच वय,लिंग, भौगोलिक-आर्थिक-सामाजिक अंतर इ. निकषांच्या अतीत असते, स्वयंभू असते.(शक्य आहे,कदाचित् काहींना ही वृत्ती व्यक्ती ऐवजी एखाद्या पाळीव प्राण्यात,निसर्गात, पुस्तकांत सुद्धा सापडू शकेल !)

असं काही घडतं की, माणसांच्या आणि वस्तूंच्या या अपार कोलाहलात अवचित एक संवादी सूर ऐकू येऊ लागतो आणि मग त्या सुराशी असे लयदार सख्य जुळून येते की, आयुष्य म्हणजे एक जमलेली  सुरेल मैफलच होऊन जाते! निरपेक्ष ,अयाचित दान देणाऱ्या प्राजक्तासारखी परिमळणारी ! …..म्हणूनच राधा कृष्णाची सखी होऊ शकते आणि कृष्ण द्रौपदीचा सखा !!   

कविवर्य ग्रेस यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, असे सखीत्व म्हणजे

‘ सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला  !’

ज्यांना आयुष्यात असा सखीपणाचा आपापला    ‘राघव शेला  ‘ सापडला आहे, त्यांनी तो खूप निगुतीने सांभाळावा,हीच एका सखीची अपेक्षा!!

संग्राहिका – सौ. राधा पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments