वाचताना वेचलेले
☆ दगड… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
शाळेत बाई म्हणाल्या, “आपल्या आवडत्या विषयावर निबंध लिहा.”
एका मुलाने निबंध लिहिला…
विषय – दगड.
‘दगड’ म्हणजे ‘देव’ असतो,
कारण तो आपल्या आजूबाजूला
सगळीकडे असतो..
पाहिलं तर दिसतो..
अनोळख्या गल्लीत तो
कुत्र्यापासून आपल्याला वाचवतो…
हायवेवर गाव
केव्हा लागणार आहे, ते दाखवतो…
घराभोवती कुंपण बनून रक्षण करतो…
स्वयंपाकघरात
आईला वाटण करून देतो…
मुलांना झाडावरच्या
कैऱ्या, चिंचा पाडून देतो…
कधीतरी आपल्याच डोक्यावर बसून भळाभळा रक्त काढतो आणि आपल्याला शत्रूची जाणीव करून देतो…
माथेफिरू तरुणांच्या हाती लागला तर, काचा फोडून त्याचा राग शांत करतो…
रस्त्यावरच्या मजुराचं
पोट सांभाळण्यासाठी
स्वत:ला फोडून घेतो…
शिल्पकाराच्या मनातलं
सौंदर्य साकार करण्यासाठी
छिन्नीचे घाव सहन करतो…
शेतकऱ्याला झाडाखाली क्षणभर विसावा देतो…
बालपणी तर स्टंप,
ठिकऱ्या, लगोरी अशी
अनेक रूपं घेऊन आपल्याशी खेळतो…
सतत आपल्या मदतीला
धावून येतो, ‘देवा’ सारखा…
मला सांगा,
‘देव’ सोडून कोणी करेल का
आपल्यासाठी एवढं ?
बाई म्हणतात –
“तू ‘दगड’ आहेस.
तुला गणित येत नाही.”
आई म्हणते,
“काही हरकत नाही,
तू माझा लाडका ‘दगड’ आहेस.”
देवाला तरी कुठे गणित येतं ! नाहीतर त्याने फायदा-तोटा बघितला असता,
तो व्यापारी झाला असता.
आई म्हणते,
“दगडाला शेंदुर फासून
त्यात ‘भाव’ ठेवला की,
त्याचा ‘देव’ होतो.”
म्हणजे, ‘दगड’ ‘देव’ च असतो.
निबंधाला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈