?  वाचताना वेचलेले  ? 

☆ वयपरत्वे लक्षविचलीत वृत्ती :A.A.A.D.D. {Age-Activated Attention Deficit Disorder} ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

आता ही वृत्ती म्हणजे काय ते माझ्याच उदाहरणाने पाहू या.

एकदा मी बागेला पाणी घालायचे ठरविले. रबरी नळी नळाला जोडून ती उलगडत बागेकडे जातांना माझं लक्ष माझ्या कारकडे गेलं आणि ठरवलं. कार धुवायला हवी.! 

म्हणून मी माझा मोर्चा गॅरेजकडे वळवला तोच माझं लक्ष जिन्याजवळच्या टपाल पेटीकडे गेलं.

म्हटलं आता आधी काय टपाल आलंय ते आधी पाहूया आणि मग कार धुवूया.!

टपालपेटीवर कारची चावी ठेवून, टपालपेटीतले सर्वच टपाल दोन्ही हातात घेऊन मी घरी आलो. सर्व पाकिटे एक एक करुन उघडीत, निरुपयोगी कचरापेटीत टाकायची पत्रे एका बाजूला टेबलावर ठेवली.

ती टेबलाखालच्या डब्यात टाकण्यासाठी बघतो तर तो डबा कागदपत्रांनी तुडूंब भरलेला.! 

मग टाकायची पत्रं टेबलावर ठेऊन तो डबा प्रथम कचराकुंडीत रिकामा करायला खाली जिन्याजवळ जायचं ठरवलं.

आता खाली जातोच आहे तर तिथे जवळच बिलांचे चेक टाकायची पेटी आहे, त्यात आताच चेक टाकावे असं ठरवलं.

चेक लिहायला घेतल्यावर एकच चेक शिल्लक असल्याचे कळले. दुसरे चेकबुक घ्यायला कपाटाकडे वळलो तर टेबलाकडे नजर गेली आणि बरेच दिवसांपासून शोधत होतो तो माझा वाचायचा चष्मा दिसला.

तो उचलून जागेवर ठेवणार, इतक्यात त्याच्याजवळ फ्रीजमध्ये ठेवायची पाण्याची बाटली  रिकामी पडलेली दिसली. 

तेव्हा आताच ती पाणी भरुन फ्रीजमध्ये टाकावी म्हणून उचलून मी स्वयंपाकघरात गेलो. तिथे ओट्यावर कुणी टी.व्ही. चा रीमोट ठेवला होता.

मनात विचार आला की संध्याकाळी टी.व्ही. लावतांना रीमोट कुठे आहे ते आठवणार नाही. तेव्हा आताच तो टिपाॅयवर ठेवावा. पण तत्पुर्वी बाटली पाण्याने भरावी. तेव्हढ्यात ती काचेची बाटली माझ्या हातातून सटकली आणि खाली लादीवर पडून फुटली.!

लादीवरचे काचेचे तुकडे गोळा करुन लादी पुसतांना विचार करायला लागलो.

मी बागेला पाणी घातलं नाही,

कार धुतली नाही,

डबा कचराकुंडीत रिकामा केला नाही,

बिलांचे चेक टाकले नाहीत,

वाचायचा चष्मा, रीमोट जागेवर ठेवले नाहीत,

कारची चावी कुठे ठेवली तेही आठवत नाही.!

माझा सगळा दिवस कामाच्या घाईगडबडीत गेला आणि माझी खूपच दमछाक झाली. तरी एकही काम धड झालं नाही, असं का.?

अशी धरसोड वृत्ती वयपरत्वे सर्वच व्यक्तींना येईल असे नाही. खालील गोष्टींचा अवलंब केल्यास ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

१. शारीरिक व मानसिक द्दष्टीने सक्रीय रहावे.

२. कामाचे नियोजन करावे. करावयाच्या कामांची यादी करुन कामांचा प्राधान्यक्रम लावावा. 

३. प्राधान्यक्रम लावतांना केवळ तातडीची कामेच नव्हे तर महत्वाची कामेही लक्षात घ्यावी.

४. खिशात/पर्समध्ये आणि घरात हाताशी मिळेल अशा जागी, एक छोटी वही व पेन ठेवावे आणि कधीकधी अचानकपणे एखादी गोष्ट करायची आहे ते डोक्यात येते, तेव्हाच त्याची नोंद करावी. कधीकधी अशा गोष्टीचे थोड्याच वेळात विस्मरण होते आणि आठवण्याचा खूप प्रयत्न करुनही अाठवत नाही, म्हणून मन अस्वस्थ होते.

५. एका वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करु नये. एकच काम हाती घेऊन, ते पूर्ण केल्याशिवाय दुसरे काम हाती न घेण्याची सवय करावी.

६. स्वयंशिस्त बाळगावी.

७. वय वाढते तसे ‘मन धावते,  पण शरीर धावू शकत नाही’ याचेही भान ठेवावे. शारीरिक हालचाली झेपतील अशाच गतीने कराव्या. 

८. सर्व कामे स्वतःच करण्याचा हट्ट धरु नये. काही कामे दुसऱ्या व्यक्तींवर सोपवावयास मनाची तयारी करावी. 

९. कामे उरकायची आहेत, हा विचार ताणतणाव निर्माण करतो. मात्र प्रत्येक काम करण्यातील आनंद घेत काम केल्यास वेळ मजेत जाईल. 

ध्यानधारणेचा मन स्थिर ठेवण्यास उपयोग करा.

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments