सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
वाचताना वेचलेले
☆ गीतांजली भावार्थ …भाग 50 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆
९२.
माझ्या डोळ्यावर अखेरचा पडदा पडेल,
या पृथ्वीवरील दृश्य दिसेनासं होईल,
जीवन शांतपणं रजा घेईल.
तो दिवस येणार हे मला ठाऊक आहे.
रात्री चांदण्यांचा पहारा असेल,
नेहमीप्रमाणे सकाळ उगवेल आणि
सागराच्या लाटाप्रममाणं सुख – दुःखावर
कालक्रमण होत राहील.
जेव्हा माझ्या अखेरच्या क्षणाचा
विचार मनात येतो,
तेव्हा क्षणाचं बंधन तुटतं आणि मृत्यूच्या
प्रकाशात तुझं अस्ताव्यस्त वैभव मला दिसतं .
तिथं सर्वात कमी दर्जाचं आसन
अगदी क्वचितच असतं,
जीवनातील क्षुद्रताही अगदी क्वचितच असते.
ज्या गोष्टीची निरर्थक वासना मी धरली होती,
आणि ज्या गोष्टी मला प्राप्त झाल्या होत्या,
त्या सर्व किती निरर्थक आहेत
हे आता मला समजतं.
ज्यांच्याकडं मी दुर्लक्ष केलं आणि
त्या लाथाडल्या त्यांचं मोल आता मला कळतं.
९४.
माझी सुटका झाली. बंधूंनो! मला निरोप द्या.
नमस्कार! आम्ही जातो!
या माझ्या घराच्या किल्ल्या! माझ्या घरावरील
सर्व हक्क मी तुमच्या स्वाधीन करतो.
मधुर शब्दांत तुम्ही निरोप द्यावा एवढीच माझी इच्छा!
फार पूर्वीपासूनचे आपण शेजारी -शेजारी!
मी तुम्हाला जे देऊ शकलो
त्याहून अधिकच मला मिळालं.
दिवस उजाडलाय.
माझा काळोखी कोपरा प्रकाशणारा दिवा
आता विझला आहे.
बोलावणे आले आहे.
प्रवासाला जायची माझी तयारी झाली आहे.
मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी
मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर
प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी
कोल्हापूर
7387678883
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈