वाचताना वेचलेले
आजी … लेखक – अज्ञात संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
निर्माल्याच्या जवळ असूनही,
कमाल असते ताजी !
अस्थिर हाती सुस्थिर माया,
म्हणजे खंबीर आजी !
आईहुनही घाली पाठीशी,
चूका करुनही माफ !
माया सांगे आत उकळती,
चश्म्यावरची वाफ !
एका पिढीला मधे ठेऊनी,
जिची उडी आवेगी !
तरलपणाने तिला समजते,
सगळे बसल्या जागी !
आता केवळ शतकासाठी,
नगण्य उरले कमी !
शतकपूर्तीची तिला असावी,
शंभर टक्के हमी !
रसाळ होता कमाल आंबा,
ठिबकत असते आजी !
पूर्ण फुलानी भरली फांदी,
तशीच झुकते आजी !
आजी असते निरांजनातील,
थरथरती फुलवात !
भविष्य आणि भूतामधली,
वर्तमानी रुजवात !
जरी उसवला तरीही असतो,
आजी भक्कम पीळ !
आणि घराच्या गालावरचा,
सौंदर्याचा तीळ !
घरात कायम आजी म्हणुनी,
दार घराचे खुले !
तिन्हीसांजेला अध्यात्माचे,
फूल भक्तिवर फुले !
🙏🏻 सगळ्या आजीना समर्पित 🙏🏻
संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈