श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ उरलेलं अन्न… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
घरात किंवा एखाद्या कार्यक्रमात उरलेलं अन्न तुम्ही गरीबांना दान म्हणून देणार असाल, तर त्यापूर्वी हे आवर्जून वाचावे !
—
साधारण महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल. मी राहतो त्या चौकापासुन काही अंतरावर एक लहान गल्ली आहे त्या गल्लीतल्या अपार्टमेंटमध्ये राहणारे बरेचसे भाडेकरू I.T. मध्ये काम करणाऱ्यांपैकी आहेत. त्यांच्यापैकीच सुरज हा एक माझा मित्र आहे. मुळचा सोलापूरचा असणारा हा तरुण अभियांत्रिकीची पदवी मिळवून आता नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाला आहे. अविवाहित असल्यानं तो आणि त्याच्याच कंपनीतील अजून दोघे असे फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. एखाद्या रविवारी सकाळी चहाच्या निमित्तानं आम्ही अधूनमधून भेटत असतो. अशाच एका सकाळी चहाच्या कपासोबत त्याने ऐकवलेला हा अनुभव….
..
— शनिवारी रात्री आमची जोरदार पार्टी झाली होती. घरमालकाच्या कडक सूचना असल्यानं आमच्या पार्ट्या घराबाहेरच साजऱ्या होतात. रात्री बऱ्याच उशिरा आम्ही आटोपतं घेतलं. अन्न बरंच शिल्लक राहिलं होतं, काही काही पदार्थांना तर अक्षरश: हात सुद्धा लावलेला नव्हता. अन्न वाया घालवणं माझ्या जीवावर आलं होतं, त्या मुळे मी त्यांना पार्सल करून देण्याची विनंती केली. रात्री खूप उशिरा आम्ही फ्लॅटवर परत आलो. मी आल्या आल्या सर्व अन्न फ्रीजमध्ये ठेवुन दिलं आणि झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते, दोन्ही मित्र अजूनही घोरत होते. मला चहाची खूप तलफ आली होती पण चहा बनवून घ्यायचा कंटाळा आला होता, दूध विकत आणण्यापासून तयारी होती.
असेच जाऊन खाली चौकातल्या टपरीवर चहा घ्यावा आणि परत येताना दूध घेऊन यावं असा विचार करून मी शॉर्ट्स आणि टी शर्ट वर बाहेर पडलो. चांगला एकाला दोन कप कडक चहा झाल्यावर थोडं बरं वाटलं.
..
मग जरा आजूबाजूला लक्ष गेलं, टपरी चौकातच असल्यानं गर्दी बऱ्यापैकी असते आणि गर्दी असते म्हणून मग भिकारीही बरेच असतात. असाच एक हडकुळा, गालफडं बसलेला, एका हाताने फाटक्या शर्टचा गळा घट्ट आवळुन धरलेला एक वयस्कर भिकारी माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि दीनवाणेपणाने काहीतरी पुटपुटत एक हात पुढं केला. मी शक्यतो पैसे देत नाही पण बऱ्याचदा जुने पण धडके कपडे, वापरात नसलेल्या वस्तु वगैरे देत असतो. त्याला पहाताच मला फ्रीजमधल्या अन्नाची आठवण झाली. आम्ही तिघांनी खाऊन सुद्धा बरचसं उरलं असतं एवढं अन्न शिल्लक होतं. त्यातील त्याला थोडंसं द्यावं म्हणुन मी त्याला विचारलं, त्यानंही मान डोलावून होकार दिला. मग पुढं मी आणि माझ्या मागुन रखडत्या पावलांवर तो असे फ्लॅटजवळ आलो. त्याला फाटकाबाहेरच थांबवून मी आतुन अन्नाची काही पॅकेट्स प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणली आणि त्याच्या हातात दिली. त्यानं एकवार त्याच्याकडं पाहिलं आणि कृतज्ञतेने दोन्ही हात जोडुन मला नमस्कार केला. आणि त्याच रखडत्या चालीने हळूहळू निघून गेला. मलाही हातून एक चांगलं काम घडल्याचं समाधान वाटलं.
..
पाहता पाहता रविवार संपला आणि दुसऱ्या दिवशीचे वेध लागले. माझी सकाळची ९ वाजताची ड्युटी असते त्यामुळं मी आठ वाजताच घरातून बाहेर पडतो. अंघोळ आटोपुन आरश्यासमोर भांग पाडत असताना कसला तरी आरडाओरडा आणि गोंधळ माझ्या कानावर पडला. काय झालंय ते पहावं म्हणुन मी दार उघडुन बाल्कनीमधून खाली डोकावून पाहिलं. सोसायटीच्या गेटबाहेर झोपडपट्टीतल्या असाव्यात अश्या वाटणाऱ्या आठ दहा स्त्रिया आणि सात आठ पुरुषमंडळी वॉचमन समोर कलकलाट करत हातवारे करत होती. मी बाल्कनीतुन खाली पहात असताना त्यांच्यातील एकाचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तो माझ्याकडे बोट दाखवून काहीतरी ओरडायला लागला आणि मग सर्वच जण वरती पाहत गोंगाट करायला लागले.
..
मला कश्याचीच कल्पना नव्हती. तेवढयात वॉचमनने मला खूण करून खाली बोलावलं. दरवाजा लोटुन घेऊन मी खाली गेलो. त्या घोळक्यात तो कालचा भिकारीही दिसत होता पण त्याच्या आदल्या दिवशीच्या आणि त्या वेळच्या रूपात आता जमीन अस्मानाचा फरक होता. आदल्या दिवशी पुटपुटल्यासारखा येणार आवाज आता चांगला खणखणीत येत होता आणि कंबरेत वाकुन रखडत चालणारा म्हातारा आता चांगला दोन पायांवर ताठ उभा होता. मला समोर पहाताच त्यानं माझ्यावर एक बोट रोखुन अर्वाच्य शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली आणि मग बाकीचे लोकही ओरडु लागले.
..
मला नक्की काय घडतंय तेच कळत नव्हतं. अजून दहा पंधरा मिनिटे गोंधळ झाल्यानंतर मग मला असं सांगण्यात आलं की, मी आदल्या दिवशी दिलेलं अन्न खाऊन त्यांच्यातील एक लहान मुलगा आजारी पडला, त्याला दवाखान्यात न्यावं लागलं आणि त्यापोटी झालेला खर्च सात हजार रुपये हा मी द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं.
..
ते ऐकून मी सर्दच झालो, वास्तविक तेच अन्न आम्हीही रविवारी दुपारी खाल्लं होतं आणि आम्ही ठणठणीत होतो. आता त्यांच्यातल्या बायका पुढं झाल्या आणि त्यांनी अक्षरश: मला चहूबाजूंनी घेरून शिव्यांचा दणका उडवला. एव्हाना अपार्टमेंट मधील प्रत्येक बाल्कनीतुन चेहरे डोकावून पहायला लागले होते. मला मेल्याहुन मेल्यासारखं झालं होतं. तोपर्यंत मित्रही खाली आले होते.
..
ते लोक सरळ सरळ आम्हाला लुटतायत हे कळत असुनही काही करता येत नव्हतं. आमच्या अगतिक अवस्थेची त्यांना कल्पना आल्यामुळं आता त्यांच्यातील पुरुष मंडळी आमच्या अंगाशी झटायला लागली. बहुतांशी लोकांच्या तोंडाला आंबुस वास येत होता. मी कशीबशी सुटका करून त्यांच्या घोळक्यातून बाहेर आलो आणि पोलिसांना फोन लावावा म्हणून फोन बाहेर काढला (इतक्या वेळ फोन बाहेर काढला नव्हता, न जाणो त्यांनी कदाचित हिसकावूनही घेतला असता.)
..
“काय करताय साहेब ?” मला वॉचमनने विचारलं. “पोलिसांना फोन करतोय” मी उत्तरलो. “काही फायदा नाही साहेब, या लोकांना काही फरक पडत नाही. उलट उद्या पुन्हा शंभरभर लोकं येऊन गोंधळ घालतील, तुम्ही कशाला दिलात त्यांना खायला?” वाॅचमन म्हणाला.
..
माझ्या चांगुलपणाची ही परिणीती पाहून मी हबकुन गेलो होतो. वॉचमन मराठी होता, माझ्याच जिल्ह्यातील होता. अखेरीस त्याने पुढं होऊन रदबदली केली आणि दोन हजारांवर सौदा तुटला. मी आणि माझ्या मित्रांनी निमूटपणे पैसे गोळा करून त्यांच्या हातात दिले तेव्हाच जमाव हलला.
..
माझ्या निर्णयाबद्दल मी क्षणोक्षणी पस्तावत होतो.
हल्ली मी उरलेलं अन्न फक्त कुत्र्यामांजरांनाच खाऊ घालतो किंवा चक्क फेकुन देतो. आणि गंमत म्हणजे तो म्हातारा भिकारी अजूनही मी दिसलो की निर्लज्जपणे फिदीफिदी हसत माझ्यापुढे हात पसरतो– “दादा, द्या काही गरिबाला पोटाला !”
..
माझ्या चांगुलपणापायी झालेली ही शिक्षा माझ्या नेहमीच स्मरणात राहणार आहे
..
ता. क. हल्ली पुण्यात तरी हा धंदा जोरात सुरू आहे असं दिसतं. आदल्या दिवशी शिळं पाकं अन्न घेऊन जायचं, अन दुसऱ्या दिवशी अख्खी वस्ती आणुन राडा करायचा. दिवसाला सात आठ हजार रुपयाला मरण नाही.
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈